कोल्हापूर : कोल्हापूर विभागात दहावीच्या परीक्षेमध्ये गुण देताना खूप मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. कोल्हापूर विभागामध्ये जे विद्यार्थी खेळाडू म्हणून परीक्षेसाठी बसले होते त्यांना राज्य सरकारने दिलेल्या नियमानुसार गुण देणे अपेक्षित होते. मात्र तसं न करता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना कमीत कमी 5 इतकेच गुण दिले आहेत. त्यामुळे जिल्हा पातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्याला देखील पाच गुण आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्याला देखील पाच गुण देण्यात आले आहेत. यावर पालकांनी आणि क्रीडा शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खेळाडूंना गुण देताना राज्य शासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्यामध्ये जिल्हा पातळीवरती खेळणाऱ्या विद्यार्थ्याला पाच गुण, राज्य पातळीवरती खेळणाऱ्या विद्यार्थ्याला दहा किंवा बारा गुण आणि राष्ट्रीय पातळीवरती खेळणाऱ्या विद्यार्थ्याला पंधरा किंवा वीस गुण देणे अपेक्षित असते. मात्र तसं न करता सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पाच गुण दिले आहेत.
बोर्डाने चूक मान्य केली
कोल्हापूर विभागामध्ये जवळपास 51 हजार विद्यार्थी क्रीडा आणि विविध कला प्रकारामधून परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 4 हजार 345 विद्यार्थी क्रीडा विभागातून आणि उर्वरित विद्यार्थी चित्रकला, लोककला, एनसीसी या विभागातील होते. काही क्रीडा शिक्षकांनी ही चूक बोर्डाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बोर्डाने आपली चूक मान्य केली आहे. त्याचबरोबर यासंदर्भातली दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रकं दिली जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशावेळी अडचण
असं असलं तरी जे गुण ऑनलाइन पद्धतीने देण्यात आले आहेत त्यामध्ये आता बदल होणार नाही. त्यामुळे पुढील प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांना सुधारित दिलेले गुणपत्रक ग्राह्य धरण्यासंदर्भात बोर्डाकडून विद्यार्थ्यांना एक पत्र देखील दिले जाणार आहे. या सगळ्या प्रकारावर क्रीडा शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दहावीच्या निकालाची विभागनिहाय टक्केवारी
- पुणे : 94.81 टक्के
- नागपूर : 90.78 टक्के
- संभाजीनगर : 92.82 टक्के
- मुंबई : 95.84 टक्के
- कोल्हापूर : 96.78 टक्के
- अमरावती : 92.95 टक्के
- नाशिक : 93.04 टक्के
- लातूर : 92.77 टक्के
- कोकण : 99.82 टक्के
ही बातमी वाचा: