Continues below advertisement

Shoumika Mahadik on Gokul AGM: गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी महाडिक गटाच्या संचालिका महाडिक महायुतीचा चेअरमन असल्याने व्यासपीठावर दिसणार की विरोधात राहूनच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार? अशी चर्चा रंगली होती. मात्र, शौमिका महाडिक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला व्यासपीठावर जाणार नसल्याचे म्हटलं आहे. शौमिका महाडिक यांनी उद्याच्या (9 सप्टेंबर) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागतानाच आपण व्यासपीठावर का जाणार नाही याची कारणमीमांसा केली. आम्ही आतापर्यंत जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्या संदर्भात आमचे अजूनही शंका निरसन झालेलं नाही. त्यामुळे उद्याच्या सभेतही मी व्यासपीठावर बसणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

मुश्रीफ यांच्यासोबत आजपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही

त्या म्हणाल्या की, सभेमध्ये संचालक वाढीचा विषय येणार असून या संचालक वाढीला आमचा विरोध आहे. संचालक संख्या वाढवून संचालकांच्या होणाऱ्या खर्चावर आणखी भर घालू नये असेही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान गोकुळमध्ये महायुतीची सत्ता असल्याचं बोललं जात आहे, या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आलं असता शौमिका महाडिक यांनी सांगितले की, जर तुम्ही म्हणत असाल की महायुतीची सत्ता आहे तर गोकुळच्या अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो छापलेला नाही. व्यासपीठावर जाण्यासंदर्भात आपण वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोकुळच्या सभेबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आजपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Continues below advertisement

आमचे चेअरमनना सर्व सहकार्य असेल

शौमिका महाडिक यांनी सांगितले की गेल्या चार वर्षांपासून मी विरोधी गटाची संचालिका म्हणून काम केलं आहे. पाच वर्ष मला विरोधी संचालिका म्हणूनच काम करावे लागेल, असं वाटलं होतं. मात्र, राजकारणामध्ये परिस्थिती एकसारखी राहत नाही. त्यांनी पुढे सांगितले की आमच्या विरोधकांप्रमाणे आम्हाला दोन्ही दगडावर हात ठेवून राजकीय फायदा घेता येत नाही. त्यामुळे उद्याची सभा शांततेत पार पाडण्यासाठी आमचे चेअरमनना सर्व सहकार्य असेल.

आमचे अजूनही शंका निरसन झालेलं नाही

त्यांनी पुढे सांगितले की, आमचा आक्षेप हा 2023 24 या आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहारांवर असून मागच्या कारभारावर आम्ही खापर नवीन चेअरमनवर फोडणार नाही. यावेळी उद्याच्या सभेला सहकार्य करण्याचे संकेत शौमिका महाडिक यांनी दिले. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी गोकुळची नवीन चेअरमन हे कागलचे आहेत. माझ्या माहेरचे आहेत, माझ्या भावाप्रमाणे असल्याचे सांगितलं. त्यामुळे गोकुळच्या चेअरमनना आमचे सहकार्य असेल असं त्यांनी नमूद केलं.