Shaktipeeth Expressway: कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वज्रमुठ आवळली आहे. आता यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रदीप नरके यांचाही समावेश झाला आहे. करवीर मतदार संघातील नरके यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं आहे. मात्र, या पत्रावरून आता कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी नरके यांना सुनावलं आहे. 

Continues below advertisement

शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले

क्षीरसागर म्हणाले की, चंद्रदीप नरके यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करू नये ते ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत ती वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कदापि सहन करणार नाहीत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गावरून आता शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नरके ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत ती वक्तव्य योग्य नाहीत असंही क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. विरोधक जी भाषा बोलत आहेत ती भाषा चंद्रदीप नरके यांनी बोलू नये असे देखील आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुनावलं आहे.

कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या मुद्द्यावर देखील नरके यांनी विरोधाची भाषा केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलल्याचं क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शक्तिपीठ महामार्गाला त्यांनी विरोध करू नये असं क्षीरसागर म्हणाले. त्यामुळे शक्तिपीठच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे दोन्ही आमदार एकमेकांविरोधात गेले आहेत. 

Continues below advertisement

नवीन समांतर मार्गाची आवश्यकता नाही 

दरम्यान, चंद्रदीप नरके यांनी विद्यमान राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध असताना नवीन समांतर मार्गाची आवश्यकता नसून, हा प्रकल्प करवीर मतदारसंघातून न नेता पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

त्यांनी म्हटलं आहे की, करवीर तालुक्यातील केर्ली, केर्ले, पाडळी बुद्रुक, निटवडे, शिंदेवाडी, खुपीरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला या गावांतील शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांच्या तीव्र भावना यावेळी मांडल्या. या प्रकल्पामुळे सुपीक जमिनींचे मोठ्या प्रमाणात अधिग्रहण होऊन शेती व्यवसायावर व स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली.

पूरस्थितीचा धोका वाढू शकतो

या महामार्गामुळे जलस्रोतांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होऊन पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, ही बाबही निदर्शनास आणून दिली. करवीर तालुक्यातील अनेक ग्रामसभांनी या प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केले असून स्थानिक पातळीवर सुरू असलेला विरोधही अधोरेखित केला.

इतर महत्वाच्या बातम्या