Gokul Chairman : शशिकांत पाटील की नाविद मुश्रीफ? 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची उत्सुकता शिगेला; आज दुपारी लखोटाबंद नाव समोर येणार!
Gokul Chairman : शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाला अप्रत्यक्ष विरोध झाल्याने अध्यक्षपदाची माळ हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांच्या सुद्धा नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Gokul Chairman : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळच्या (Gokul) अध्यक्ष निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमध्ये सत्ताकारण चांगलंच पेटलं आहे. त्यामुळे अध्यक्षांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरूच आहे. दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी सर्वसहमतीने शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली असतानाच पुन्हा एकदा गोकुळच्या अध्यक्ष निवडीमध्ये ट्विस्ट आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही स्थितीत महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे, संचालकांची एकजू ठेवा असा संदेश देताच पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी काथ्याकूट सुरु करण्यात आला.
अध्यक्षांचे नाव लखोटाबंद करण्यात आले
राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी गोकुळच्या राजकारणात लक्ष घातल्याने त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. नव्या अध्यक्षांच्या निवडीवर जिल्हा बँकेत अध्यक्षांच्या दालनात तब्बल अडीच तास चर्चा झाली. यानंतर नव्या अध्यक्षांचे नाव लखोटाबंद करण्यात आले आणि हा लखोटा माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. अध्यक्षांचे नाव लखोटाबंद करण्यात आला असून ते आज (30 मे) उघड होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडली जाणार, याची उत्सुकता जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिगेला पोहोचली आहे.
नाविद मुश्रीफ यांच्या सुद्धा नावाची चर्चा
दरम्यान, शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाला अप्रत्यक्ष विरोध झाल्याने अध्यक्षपदाची माळ हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांच्या सुद्धा नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, आता आज दुपारीच लिफाफाच उघडला जाणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे नाविद मुश्रीफ अध्यक्ष झाले, तर महायुतीचा अध्यक्ष असणार आहे. नाविद मुश्रीफ तातडीने परदेशातून कोल्हापुरात दाखल झाल्याने त्यांच्या नावाची अधिकच चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, जिल्हा बँकेत अध्यक्षांच्या दालनात अडीच तास बैठक चालल्याने चांगलाच घालमेल दिसून आला. या बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार संजय घाटगे तसेच सर्व नेते जिल्हा बँकेमध्ये आले होते. यावेळी अध्यक्षांच्या दालनामध्ये नव्या अध्यक्षांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी गोकुळचे सर्व संचालक सुद्धा उपस्थित होते. जसजसा बैठकीचा कालावधी वाढत गेला तशी संचालकांमध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून आले.
























