Hasan Mushrif ED Raid : माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आल्याची चर्चा रंगली आहे. साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. 


पुण्यातील कंपन्यांवर छापा


माऊंट कॅपिटल आणि रजत कंझ्युमर्स या दोन कंपन्यांशी संबंध असलेल्या पुण्यातील कंपन्यांवर छापेमारी केल्याची माहिती आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून मुश्रीफांच्या संबंधितांनी पैसे मिळून कारखान्यात गुंतवल्याचा संशय आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संदर्भात काही बँक खात्यांची सुद्धा चौकशी सुरु असल्याचे समजते. 


हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर


किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. यापूर्वी 11 जानेवारी रोजी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर 21 दिवसांनी ईडीने ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासह कागल तालुक्यातील सेनापशी कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी शाखेवर छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.  


कोल्हापूर जिल्हा बँकेच्या चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुश्रीफ आणि त्यांच्या तिन्ही मुलांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी सुद्धा मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनीही शेतकऱ्यांचे 40 कोटी कुठे गेले सांगा म्हणत आरोपांच्या फैरी सुरुच ठेवल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या