कोल्हापूर : खासदार शाहू महाराज यांचे राधानगरी तालुक्यामध्ये माजी आमदार के. पी. पाटील यांनी केलेल्या जोरदार स्वागतानंतर लगेचच बिद्री साखर कारखान्यावर छापा टाकण्यात आला. त्यामुळे कारवाई सुडबुद्धीतून झाली असल्याची संशय व्यक्त करायला जागा असल्याची खोचक टीका काँग्रेस आमदार तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केली. सतेज पाटील, के पी. पाटील आणि हसन मुश्रीफांच्या पॅनेलने बिद्री कारखाना निवडणुकीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडवला होता.  कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सर्वसामान्य जनतेस स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची सक्ती करू नये, असे निवेदन देण्यात आले. यावेळी सतेज पाटील यांनी नागरिकांच्या माथी प्रीपेड मारली जात असल्याचे सांगितले. 


महामार्ग रद्द करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी


पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरील भूमिका आपली पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत सरकारची भूमिका दुटप्पीपणाची आहे. हे सरकार आपली कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडत नाही. सरकारला इतकीच शक्तीपीठांची काळजी असल्यास प्रत्येक शक्तिपीठाला पाच पाच कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शक्तीपीठाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांमुळे त्यामुळे चांगल्या सुविधा निर्माण होतील. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. 


चूक केली आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे


दरम्यान पेटवडगावमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या उपोषणावर पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की गेल्या चार दिवसांपासून महिला उपोषण करत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांकडून दोन्ही बाजू समजावून घेऊन कारवाई होणं अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. चूक केली आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सरकार आपल आहे म्हणून विरोधकांवर कारवाई करणे हे योग्य नसल्याचे पाटील म्हणाले. तीन महिन्यानंतर सरकार बदलणार असण्याचा विश्वासही पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


बिद्री साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा


दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी के. पी. पाटील चेअरमन असणाऱ्या साखर कारखान्याची कारवाई झाली त्याचा मी निषेध करतो, असे म्हटले आहे. महाविकास आघाडीकडे के पी पाटील जात आहेत म्हणून त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला, पण हा 65 हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर कारवाई करणे हे मला आवडलेलं नाही. बिद्री साखर कारखाना हा 65 हजार सभासदांच्या मालकीचा असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. त्यामुळे अशा प्रकारचे राजकारण करून कोणी यशस्वी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या