Satej Patil and Raju Shetti: राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी एकवटत शक्ती लावल्यानंतर आता बाधित 13 जिल्ह्यातून विरोधी संघर्ष वाढू लागला आहे. काल (20 मे) कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यातून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एकमुखी निर्धार करत शक्तीपीठचा डाव मोडून काढण्याचा निर्धार केला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार सर्वपक्षीय मेळाव्यात नेत्यांसह शेतकऱ्यांनी केला. या मेळाव्यामधूनच 9 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय विराट महामोर्चाचे आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे. हा मोर्चा ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावरती निघणार आहे.
जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल
कसबा बावड्यात झालेल्या सर्व पक्षीय मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील नेत्यांसह बाधित हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावताना महामार्गाला कडाडून विरोध केला. या शक्तिपीठ महामार्गाने कोल्हापूर जिल्ह्याची होणारी नासाडी किती अभूतपूर्व आहे याची मांडणीच नेत्यांनी केली. या मेळाव्यामध्ये बोलताना सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून जर पोलिसांचा बळाचा वापर झाल्यास जशास तसं प्रत्युत्तर दिल जाईल, असा गर्भित इशारा दिला. पाटील म्हणाले की पोलिसांना देखील आमची विनंती असून पोलिसांच्या जोरावर जर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल. तुम्ही जर जबरदस्ती करणार असाल तर या रस्त्यावरच्या लढाईला उग्र स्वरूप लागणार आहे आणि जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा सुद्धा पाटील यांनी दिला.
पाटील यांनी सांगितले की, हा महामार्ग गरजेचा नाही. 13 जिल्ह्यांमध्ये राजू शेट्टींसह आम्ही सातत्याने भूमिका घेतली. हा शक्तिपीठ महामार्ग शक्तिपीठाला जोडणारा नाही आहे, तर फक्त निवडणुकांना शक्ती देणारा आहे, दुसरा काही अर्थ नाही. सात आठ नद्या क्रॉस करून शक्तिपीठ जिल्ह्यात जाणार आहे. कुणाची अवस्था काय होणार, शेत जमीन आमची किती जाणार हे सगळ्यांना आता माहित आहे. तीन महापुरांचे पाणी तुमच्या आणि आमच्या गावामध्ये कुठपर्यंत आले होते, याची माहिती गोळा करावी लागेल. रस्त्यावरची लढाई तर आपण करतच आहोत, परंतु तांत्रिक दृष्ट्या उद्या पटवून द्यावे लागेल की हा रस्ता आम्हाला गरजेचा नाही.
प्रत्येक गावाला रस्ते करण्यासाठी पैसे मिळतील
सतेज पाटील यांनी सांगितले की, एक लाख कोटी खर्च करण्यापेक्षा हे एक लाख कोटी सगळ्या महाराष्ट्रातल्या गावांमध्ये दिले, तर किमान दोन-पाच कोटी आपल्या प्रत्येक गावाला गावातले रस्ते करण्यासाठी मिळतील, असे ते म्हणाले. सरकारला वाटत असेल की ही नकाशावरची एक रेष आहे शेतकऱ्यांची; परंतु ती रेष नाही, आमच्या आयुष्याची रेष आहे. आमच्या आयुष्याच्या सुखा-दुःखाची रेष आहे, हे सरकारने लक्षात ठेवावे. उद्या तुम्हाला ती रेष दिसत असेल, परंतु आमच्या आयुष्याचा या ठिकाणी कोळसा करणारी आहे.
फडणवीस यांना 50 ते 60 हजार कोटींचा ढपला पाडायचाय
दरम्यान, मेळाव्याला संबोधित करताना राजू शेट्टी म्हणाले की, वारणा नदीवर ऐतवडे जि. सांगली ते बहिरेवाडी हा 6 ते 7 किमीचा कमीत कमी 20 फूटापासून 50 फूटापर्यंत भराव पडणार आहे. केर्ली ते शिरोली दुमाला याठिकाणी 17 किलोमीटर अंतरावर 20 फुटापासून ते 70 फुटाचा भराव पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा , कासारी , पंचगंगा, भोगावती , तुळशी नदी ,कुंभी नदी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन महापुराची परिस्थिती निर्माण होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या भरावास हे पाणी तटल्याने पाण्याला फुग निर्माण होवून मोठ्या प्रमाणात बागायती जमीनीचे नुकसान होणार आहे.
त्यांनी सांगितले की, शक्तीपीठ महामार्गाचा एका किलोमीटरचा खर्च हा जवळपास 117 कोटी रूपये असणार आहे. या प्रकल्पातून देवेंद्र फडणवीस यांना 50 ते 60 हजार कोटींचा ढपला पाडायचा आहे. या महामार्गात सर्वाधिक पिकाऊ जमीन संपादित होणार आहे .शक्तीपीठ महामार्गाला 13 जिल्ह्यातून कडाडून विरोध होवू लागले आहेत. लोक रस्त्यावर उतरून आया बहिणींना घेऊन विरोध करू लागले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
