Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांनी भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यावर हल्लाबोल केला होता. यानंतर आता समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मला कोणती गोष्ट करायची असती तर समोरून केली असती, छातीठोकपणे मी समोर जातो, समोरून वार करतो पाठीत खंजीर खुपसत नाही, अशी प्रतिक्रिया घाटगे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, हसन मुश्रीफ साहेब तुमचे काळीज वाघाचे असेल, तुमच्यात पुरुषार्थ असेल तर आता जातीच्या मागे का लपता? जर काही केलं नसेल तर भीती कशाला वाटते? जातीच्या मागे लपून राजकारण करतो तो माणूस जातीयवादी असतो हे मुश्रीफ यांनी स्वतः सिद्ध केलं आहे. 


माझ्यावर बालिश आरोप करून मुश्रीफ साहेब स्वतःचं हसं करून का घेत आहेत, केवळ मीच नाही तर माझे कार्यकर्ते देखील त्यांना स्वप्नात दिसत आहेत. मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपत येण्याची कुणीही ऑफर दिलेली नाही. प्रत्येकवेळी तेच ते आरोप केले जात आहेत, 2024 साली निवडणूक कुणाची किती सोपी झाली हे कळेल, असेही घाटगे म्हणाले. 


माझ्यावर थेट आरोप करण्याची संधी त्यांना दिली जाईल


ते पुढे म्हणाले की, माझ्यावर बालिश आरोप करून मुश्रीफ स्वतःचं हसं करून का घेत आहेत. मुश्रीफ साहेब यांनी टीका केल्याचे माध्यमातून समजलं. मी दिल्लीत माझ्या वेगळ्या कामासाठी गेलो होतो. तीनवेळा तेच ते आरोप केले जातात. दरवेळी मोर्चा, कुटुंबाला त्रास होतो म्हणायचे. तिन्ही वेळी ठरलेली स्क्रिप्ट आहे. नवाब मलिक यांच्या पंगतीत स्वतःला का बसवून घेत आहेत? नवाब मलिक यांच्यावर वेगळे आरोप आहेत, यांच्यावर वेगळे आरोप आहेत.


नवाब मलिक यांचा पुळका का येतोय


घाटगे यांनी सांगितले की, किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांची नाव आपल्या ट्विटमध्ये घेतली आहेत. मुश्रीफ यांना केवळ नवाब मलिक यांचा पुळका का येत आहे. नवाब मलिक आणि त्यांचे जवळचे काही संबंध आहेत का? मला किरीट सोमय्या यांच्या मागे लपण्याची गरज नाही. मला जे करायचं असेल तर समोर येऊन करेन.  मुश्रीफ यांना झोपताना आणि स्वप्नात देखील समरजित घाटगे दिसतो. काळजी करू नका माझ्यावर थेट आरोप करण्याची संधी त्यांना दिली जाईल. 


इतर महत्वाच्या बातम्या