Kolhapur News : डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera borwankar) यांना जाहीर झाला आहे. रोख एक लाख एक हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. लेखक सुधीर भोंगळे यांना समाजकार्य पुरस्कार, आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत (Rahi Sarnobat) यांना युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी याबाबत माहिती दिली आहे. दत्त साखर कारखान्याचे संस्थापक व माजी आमदार दिवंगत डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिदिनी पुरस्कार वितरण केले जाते.
चालू वर्षापासून निवड समितीने परिवर्तनशील कार्यकर्त्यास स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले असून या वर्षीचा स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार कृषी क्षेत्रांतील लेखक व संशोधक सुधीर भोंगळे यांना दिला जाणार आहे. 51 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव लौकिक करणाऱ्या आदर्श राष्ट्रीय खेळाडू राही सरनोबत हिला स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील युवाप्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्काराविषयी माहिती देतानवा विनोद शिरसाट म्हणाले की, दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुका आणि परिसरात शेतकरी सहकारी संस्थाच्या माध्यमातून समृद्धीची आणि संपन्नतेची बीजे रोवली. व्यावसायिक नितीमूल्यांचा अंगीकार करीत, ध्येयवादी पद्धतीने काम करणाऱ्या सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य किंवा उद्योग या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार भारतीय पोलिस सेवेतील माजी अधिकारी मीरा बोरवणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, संचालक अनिलराव यादव, शेखर पाटील, दरगू गावडे, महेंद्र बागे, संजय पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या