Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून आरोपांचा कलगीतुरा रंगला आहे. 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आल्यानंतर विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी महाडिक गटावर कडाडून हल्ला चढवला होता. आता या टीकेला महाडिक गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी (Amal Mahadik on Satej Patil) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. साहेब आम्हाला धमकी द्यायची नाही, कुस्तीला आम्ही घाबरलो नाही, आम्ही कुस्ती खेळत आलोय, खेळणार आणि जिंकणार देखील, असा टोला त्यांनी सतेज पाटील यांना लगावला.  


अमल महाडिक म्हणाले की, साहेब आम्हाला धमकी द्यायची नाही आम्ही कोणाला धमकी द्यायला आलेलो नाही. चांगल्या सहकाराने, लोकशाहीने आणि सर्वांना सोबत घेऊन हा कारखाना चालवला आहे. त्यामुळे त्यांनी धमकीची भाषा कोणाशी करू नये. 1899 सभासदांवर अन्याय केला तोच खरा काळा दिवस आहे. आम्ही कुस्ती खेळायला घाबरलेलो नाही, आम्ही कुस्ती खेळत आलोय, आम्ही कुस्ती खेळणार आणि कुस्ती जिंकणार देखील हे मला त्यांना सांगायचं आहे. गेल्या दोन निवडणुकीमध्ये ही माझी शेवटची निवडणूक आहे म्हणत आहेत. प्रत्येक निवडणुकीला सांगतात ही शेवटची निवडणूक आहे. खोट बोल, पण रेटून बोल असा प्रकार सुरु आहे. प्रत्येक गावात जाऊन दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. 


आमच्याकडूनही जशास तसे उत्तर दिलं जाईल


दरम्यान, निवडणुकीची सर्व प्रक्रिया कारखाना प्रशासन आणि शासकीय यंत्रणा अतिशय पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने पार पाडत आहेत. तरीही जर कोणी विनाकारण कारखाना कार्यस्थळावर गोंधळ घालणे किंवा प्रशासनास वेठीस धरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडूनही जशास तसेच उत्तर दिले जाईल, असा इशारा माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिला आहे.


दिलीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सतेज पाटील गटाला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोटनियमांचे उल्लंघन केलेल्या सभासदांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. त्यामुळे सत्य परिस्थिती आणि नियमानुसार झालेली कारवाई पाहता त्यांनी या निर्णयाचा आदर करणे अपेक्षित होते. असं न करता निवडणुकीसाठी आता काहीच मुद्दा शिल्लक नसल्याने काही लोक विनाकारण या मुद्याला कवटाळून राजकारण करत आहेत. मागील आठवड्याभरात जवळपास 600 ते 700 अर्जानुसार कारखाना प्रशासनाने माहिती व दाखले तत्परतेने उपलब्ध करून दिलेले आहेत, हे मात्र विरोधक सोईस्करपणे विसरताना दिसतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या