Kolhapur Municipal Corporation Officers and Contractor Corruption: कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांपासून ते क्लार्कपर्यंत पब्लिक फंडातील टक्केवारी समोर आल्यानंतर प्रजासत्ताक संस्थेचे प्रमुख दिलीप देसाई यांनी पब्लिक फंडाचा गैरवापर एकट्या कंत्राटदारानं केला नाही, गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही फौजदारी करा, अशी मागणी केली आहे. दिलीप देसाई यांनी कोल्हापूर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना ईमेल करून संबंधित अधिकाऱ्यांवरही फौजदारीची मागणी केली आहे.
दिलीप देसाई यांनी काय म्हटलं आहे तक्रारीत?
ठेकेदार वराळे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची फसवणूक करून न झालेल्या कामाचे बिल घेतलं असल्याने त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आपण दिलेले आदेश योग्यच आहेत, त्याबद्दल आपले आभार. तथापि मुनिसिपल फंडाचा हा गैरवापर एकट्या ठेकेदार वराळेनं केलेला नाही तर त्याला सहाय्य करणारे हे कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारीच आहेत त्यामुळे ठेकेदार वराळे वर फौजदारी दाखल करत असताना त्याच गुन्ह्यात त्याला सहाय्य करणाऱ्या सर्वांवरच फौजदारी दाखल होणे क्रमप्राप्त आहे. सहाय्य करणाऱ्यांची नावेही मुख्य आरोपी ठेकेदार वराळे यांच्याकडूनच पोलिसांना समजणार आहेत.
चौकशी समितीमुळे अधिक मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता
त्यांनी पुढे म्हटले आहे की, पब्लिक फंडाच्या अपहाराचा आरोप झाला असल्याने पोलिसांनी स्वतःहून एफ आर आय दाखल करून चौकशी करणे अगत्याचे होते त्यातील तपासानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या उचित कलमांचाही अंतर्भाव करता येईल. त्यामुळे आपण चौकशी समिती नेमण्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. कर्मचाऱ्यांची वर्तणूक, कर्तव्यातील कसुरी इत्यादीबाबत चौकशी समिती नेमून चौकशी करता येते. परंतु सदरचे प्रकरण हे फौजदारी स्वरूपाचे असल्याने त्याची चौकशी व तपास पोलिसांकडूनच होणे आवश्यक आहे. चौकशी समितीमुळे निव्वळ विलंब आणि अधिक मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि त्या ठेकेदारास अपहार करण्यास मदत करणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
श्रीप्रसाद वराळेविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, कोल्हापूर मनपाचा नोंदणीकृत कंत्राटदार श्रीप्रसाद वराळेविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅकलिस्ट सुद्धा करण्यात आला आहे. खोटी बिल दाखवून 72 लाखांची बिले उचलल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून या संदर्भात फिर्याद मनपा कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी दिली आहे. विरोधाभास म्हणजे गायकवाड यांच्यावर श्रीप्रसाद वराळेनं 1 लाख 20 हजारांची ठरलेली टक्केवारी रोखीनं घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांना पाठवलेल्या पैशाचा गुगल पे स्क्रीन शाॅटही त्याने शेअर केला होता. या प्रकारानंतर मनपा प्रशासकांनी 19 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून टक्केवारीत नावे आलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. माजी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनाही नोटीस बजावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या