Kolhapur Expansion : कोल्हापूर हद्दवाढ विरोधी कृती समितीने रविवारी बोलावलेल्या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. कोल्हापूर हद्दवाढीचा निर्णय त्यांना विचारात न घेता घेण्यात येऊ नये, यासाठी विरोधी कृती समितीकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.


कोल्हापूर हद्दवाढीवरून दोन गट पडले आहेत. त्यामुळे हद्दवाढ विरोध आणि समर्थक असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून टोकाची भूमिका घेतली जात असतानाच राजकीय नेत्यांचे मौन व्रत ठळकपणे दिसून येत आहे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना बससेवा देऊ नये, अशी भूमिका हद्दवाढ कृती समितीने घेत बसेस रोखल्या होत्या. 


रविवारी हद्दवाढविरोधी समितीने बैठक बोलावली होती. मात्र, मतदारसंघातील राजकीय गणितांचा विचार करत राजकीय नेते या विषयावर स्पष्ट भूमिका घेत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. हद्दवाढ विरोधी कृती समितीने खासदार, आमदार आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रणे पाठवली होती. मात्र, बैठकीला कोणीही हजर झाले नाही.


विरोधी कृती समितीचे राजू माने यांनी सांगितले की, आम्हाला ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळत आहे. हद्दवाढ कृती समितीचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. या बैठकीला हद्दवाढीत असणाऱ्या गावांचे सरपंच उपस्थित होते. त्यांनी सार्वजनिकपणे सांगितले की, त्यांनी ग्रामस्थांना सेवा पुरविण्यात लक्षणीय प्रगती केली आहे आणि म्हणूनच हद्दवाढ त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही. लवकरच, आम्ही पुन्हा भेटून आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. 


बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी हद्दवाढीवर चिंता व्यक्त केली. अनेकांनी सांगितले की, कोल्हापूर महानगरपालिका आपल्या नागरिकांना सेवा देण्यात अपयशी ठरली आहे आणि आता हद्दीतील गावांचा समावेश करून कर वसूल करण्याचे मनसूबे रचत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या