ज्या छत्रपती शिवरायांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदवी स्वराज्यासाठी शिस्त आणि संयमाचा पाठ दिला, त्याच शिवरायांच्या जयंतीला कोल्हापूर जिल्ह्यात उत्साही तरुणांचा हैदोस; 409 वाहन चालकांना पोलिसांचा दणका
विशेष म्हणजे या सगळ्या मुलांनी एखादा पराक्रम केल्यासारखे हे सगळे हुल्लडबाजीचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

Kolhapur News: काल संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, तर अवघ्या देशात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, या आनंदाच्या वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात काही अतिउत्साही तरुणांनी दुचाकींचे सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाज काढत अक्षरशः हैदोस घातला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त आणि संयमाचे प्रतीक. मात्र, काही तरुण सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांसारखे आवाज काढत कर्णकर्कशआवाज काढत अनेक रस्त्यांवर अक्षरशः धिंगाणा घातला. हा धिंगाणा इथंच नाही थांबला तर एका ग्रुपने गाडी थेट पंचगंगा नदीत फेकल्याचा व्हिडिओ समोर आला. काहींनी स्वतः एका वीट भट्टीवर गाडी पेटवली आहे. विशेष म्हणजे या हुल्लडबाजीला वैतागलेल्या केर्ले इथं स्थानिक गावकऱ्यांनी गाड्या फोडल्या.
गाड्यांचे सायलेंसर काढून हुल्लडबाजी
भुदरगड किल्ल्यावरही सुद्धा अशाच काही हुल्लडबाजांचा एक मोठा गाड्यांचा ग्रुप मोठं मोठे आवाज काढत गेल्याचे पाहायला मिळाले. कागल तालुक्यातील कसबा सांगावं इथं सुद्धा 60 ते 70 गाड्या अशाच पद्धतीने गाड्यांचे सायलेंसर काढून हुल्लडबाजी करताना पाहायला मिळाले. याच हुल्लडबाजीतून एका ठिकाणी तरुणावर एडक्याने हल्ला झाल्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आला. विशेष म्हणजे या सगळ्या मुलांनी एखादा पराक्रम केल्यासारखे हे सगळे हुल्लडबाजीचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर अशा पद्धतीने साजरी करण्याची कोणी पद्धत पाडत असेल तर अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी सुद्धा करण्यात येत आहे.
हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई
दुसरीकडे, कर्णकर्कश हॉर्न, ड्रिंक अँड ड्राईव्ह सह अल्पवयीन चालकांच्या पालकांवर देखील शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई करण्यात आली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 409 वाहन चालकांना पोलिसांनी दणका दिला. 3 लाख 49 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करत 32 वाहनं जप्त करण्यात आली. शहर वाहतूक शाखेकडून तब्ब्ल 409 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बीभत्स नृत्याचा कार्यक्रम
दुसरीकडे, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बीभत्स नृत्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे गावामध्ये घडला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हाभरात संतापाची लाट पसरली. गावातील महाशिवरात्री यात्रेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणामध्ये लावणी
वडणगे गावातील महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणामध्ये लावणी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, जिथे हा कार्यक्रम झाला त्यामागे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. या कार्यक्रमादरम्यान केलेल्या अश्लील नृत्यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयासमोर परंपरेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम होत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ते कार्यालय पडद्याने झाकलं होतं. ग्रामपंचायत कार्यालयाचे शटर देखील बंद केलं होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाचा प्रश्न येत नसल्याचा दावा वडणगे ग्रामपंचायतीकडून करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या
























