Nagpur-Ratnagiri National Highway : देवस्थान इनाम जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान मोर्चातर्फे येत्या 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून शेतकरी आंदोलनास बसणार आहेत. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी देवस्थान इनाम जमीनी संपादीत केल्या आहेत त्याचा मोबदला राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार द्यावा, 50 टक्के रक्कम वहिवाटदार शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आहे. यापूर्वी ही या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमावेत चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. वास्तविक 1947 च्या पूर्वीपासून शेतकरी जमीनी कसत होते.7/12 कब्जेदार व इतर हक्कात त्याची नावेही आहेत.
भूसंपादनासाठीच्या निवाडा नोटीसही याच शेतकऱ्यांच्या नावे आल्या आहेत. त्यानुसार इनाम जमीनी कसनाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहीजे अशी आग्रही मागणी या आंदोलनातून मांडली जाणार आहे, अशी माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उदय नारकर, नारायण गायकवाड, चंद्रकांत कुरणे, संभाजी मोहिते, आप्पा परिट आदीनी दिली आहे.
दरम्यान, रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) भूसंपादन करण्यात आले आहे. हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले अशा चार तालुक्यातील गावांमधून जाणार आहे. त्यामुळे महामार्गासाठी आंबा ते चोकाकपर्यंत जमीन संपादनाचे कामकाज सुरु आहे.
यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या आखत्यारीतील 132 मंदिरांशी 325 गुंठे जमीन सुध्दा संपादित होणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीने भूसंपादन विभागाला पत्र पाठवून नुकसान भरपाई मागितली आहे. ही रक्कम 15 कोटी 79 लाख रुपये आहे. ही रक्कम आता कसणाऱ्या शेतकऱ्याला द्यायची की देवस्थान समितीला असा प्रश्न निर्माण झाला आहे. समितीने भूसंपादन विभागाला पत्र पाठवून नुकसान भरपाई मागितली आहे. समितीची शेकडो एकर जमिनी असल्या तरी त्या लागणदार व वहिवाटदारांकडे आहेत. देवस्थानाला कुळ कायदा लागू होत नाही. त्यामुळे दोघांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे आता तोडगा काढावा लागणार आहे.
कोल्हापुरातील जोतिबा देवस्थानच्या जमिनी परस्पर विकल्याची भीती
दुसरीकडे, दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानच्या जमिनीची परस्पर विक्री (Sale of Shree Jyotiba Devasthan land) केल्याची माहिती नव्या वर्षाच्या सुरुवातीला समोर आली होती. सातारा, गोवा व कर्नाटक राज्यात असणारी चारशे एकर जमिनीपैकी 200 ते 250 एकर जमिनीची परस्पर व्रिकी झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अशा जमिनीचा शोध घेऊन या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात घेणार आहेत. तहसिलदारांना जमिनीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या