Sangli Crime : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Mla Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबी घालून दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर आता नवा ट्विस्ट समोर आला आहे.  मूळ जागा मालक असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती  पुढे आली आहे. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीमध्ये तालुका दंडाधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जमिनीची कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. 


मिरजेतील मोक्याच्या जागेचा वाद आणि तिढा आणखी गुंतागुंतीचा होताना दिसत आहे. ज्या जागेवरील अतिक्रमण पाडले गेले त्या जागेचा आपण मूळ मालक असून जमिनीच्या मालकी हकाबाबत उच्च न्यायालयात केस सुरू आहे, असा दावा करणारी विष्णू लामदाडे ही व्यक्ती 2 दिवसाच्या राड्यांन आज पुढे  आली. तालुका दंडाधिकाऱ्यांनी पाडकामजैसे थे ठेवण्याचे आदेश देत दोन दिवसात जमिनीची कागदपत्रे सादर करण्याची दोन्ही गटाला मुदत दिली. मात्र, एकीकडे ही सुनावणी सुरु असताना आता मूळ मालक आपण असल्याचे सांगणारी व्यक्ती पुढे आल्याने गुंता आणखी वाढताना दिसत आहे.


पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी केली


दोन दिवस ज्या जागेवरील अतिक्रमण पाडले म्हणून मिरजमध्ये रस्त्यावरील धुरळ्यासह वादाचा धुरळा उडाला तो तिसऱ्या दिवशीही संपलेला नाही. सुनावणीत काय होतं हे स्पष्ट होण्यापूर्वीच तहसील कार्यालयात विष्णू लामदाडे ही व्यक्ती पुढे आली आणि त्याने डोळ्यात अश्रू आणत जो दावा केला त्यातून नवीन ट्विस्ट या वादात उभा झाला. पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी केली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, पडळकर यांनी (Brahmanand Padalkar) बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप करत विष्णू लामदाडे यांनी आपल्यात आणि चड्डा यांच्यात या जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयात केस सुरू असल्याचे दावा केला. दरम्यान, विष्णू लामदाडे यांनी या जमिनीवर मालकी सांगणाऱ्या सगळ्यावर गुन्हा दखल करा अशीही मागणी केली.


प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण हटवता आले असते


दरम्यान मिरज विधानसभा मतदारसंघाचे कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांनी त्यांच्या मतदारसंघात झालेल्या या प्रकाराबाबत प्रथमच भूमिका मांडली. जे मिरजमध्ये घडले ते योग्य नाही. प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण हटवता आले असते. रात्री अशा पध्दतीने अतिक्रमण हटवण्याची गरज नव्हती. भाजप पक्ष कुणालाही पाठीशी घालत नाही, चुकीचे असेल तर पक्ष त्यावर कारवाई करेल. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना अटकही होईल असे खाडे म्हणाले.


वरवर पाहता हे प्रकरण जागा वाद, अतिक्रमण वाटत होते. मात्र, आता यात बराच गुंता वाढताना दिसत आहे जो महसूल, जिल्हा प्रशासनाला सोडवावे लागेल.अन्य जागेवरून असे वाद पुन्हा उफाळणार नाही याचीही खबरदारी घ्यायला हवी.


इतर महत्वाच्या बातम्या