Dhananjay Mahadik on Maharashtra Karnataka Border Dispute : कानडी संघटनांकडून मंगळवारी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर संतापाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी तुमचा रस्ताही कोल्हापुरातून जातो, हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी ते दिल्लीत आहेत. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनीप प्रतिक्रिया दिली. 


धनंजय महाडिक म्हणाले, मी कोल्हापूरमध्ये स्थायिक असल्याने कर्नाटकची हद्द 10 किमीवर सुरु होते. गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्याची घटना घडली त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. वाद न्यायालयात प्रलंबित असताना अशी रस्त्यावरची गुंडगिरी, दादागिरी तेथील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शोभत नाही. जशी तुम्ही महाराष्ट्रातील वाहनांना इजा करता ते बघता कर्नाटकला देशभरात महाराष्ट्रातून जाण्याशिवाय पर्याय नाही हे यापूर्वी त्यांनी पाहिलं आहे. त्यांच्या वाहनाना कोल्हापूर, सोलापुरातून जावं लागतं याची जाणीव त्यांना असली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकाराची दर्पोक्ती करत असतील, तर महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. यावर तोडगा निघायला पाहिजे. 


दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही


दरम्यान, बेळगावसह सीमाभाग ताबडतोब केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपवण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले हा त्याच कटाचा भाग असल्याचे राऊत म्हणाले.


यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ज्या सरकारला राज्याच्या सीमा राखता येत नाहीत, त्या सरकराला एक मिनिटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. कर्नाटक महाराष्ट्रातील काही भागावर दावा सांगत असताना सरकार तोंडाला कुलूप लावून बसले आहे. यांना कुलूप निशाणी द्या असे राऊत म्हणाले.


काय चाललंय या राज्यात? डरपोक सरकार! 


"महाराष्ट्राचे लचके सहजतेनं तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलंय, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर थेट तोफ डागली. अशा प्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधीच आली नव्हती. इतके हतबल मुख्यमंत्री, इतके लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षांत पाहिलेलं नाही. दोन मंत्र्यांनी काल शेपुट घातलं, जाणार होतो. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय या राज्यात? डरपोक सरकार! ज्यांना आपल्या महाराष्ट्रातील जनतेची काळजी नाही. महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जातायत. ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करुन, बलिदान करुन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली आहे. कोणी याबाजुला कुरतडतंय, कुणी त्या बाजुनं कुरतडतंय. आणि हे सरकार षंडासारखं, नामर्दासारखं बसलेलं आहे. हो नामर्दच सरकार आहे.", असं संजय राऊत म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या