KDCC Bank : केडीसीसी बँक शेतीसह कारखानदारीमध्ये साखर कारखाने व सूत गिरण्या या मोठ्या उद्योगांना अर्थ पुरवठा करीत आहे, या पारंपारिक कर्ज पुरवठ्याबरोबरच बँकेने मध्यम व लघु उद्योगांनाही भरीव अर्थपुरवठा करण्याची धोरण स्वीकारल्याची माहिती, बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली.


बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिरोळच्या पद्मजा पॅकेजिंग या उद्योगाला 37 कोटी कर्जाचे मंजुरीपत्र देण्यात आले. आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुंजीर, संचालक हेमंत देसाई, संचालक अमर देसाई यांनी ते स्वीकारले. कंपनीमध्ये मोठ्या आकारातील कोरोगेटेड बोर्ड,  बॉक्स, कार्टून, घडीचे बॉक्स यांचे उत्पादन केले जाते. दररोज 120 टन उत्पादनक्षमता असलेल्या या उद्योगातून देशासह परदेशातही निर्यात केली जाते.


आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले की, अलीकडेच नागरी सहकारी बँकांनी एकूण कर्ज पुरवठ्याच्या ५० टक्के कर्ज 25 लाखपर्यंत देण्याबाबतच्या सूचना रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत. त्यामुळे, त्यापेक्षा जास्त मागणी असणारे कर्जदार जिल्हा बँकेकडे थेट अथवा सहभाग योजनेअंतर्गत कर्जासाठी संपर्क करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात स्थापन झालेल्या औद्योगिक वसाहतीत जागा घेऊन लघु व मध्यम प्रकल्प उभा करतात. त्यासाठी कंपनी स्थापन करून स्टार्टअप सारखे प्रकल्प जिल्ह्यामध्ये सुरू होत आहेत. त्यांनाही वाजवी दरात बँकेने पुरेसे व वेळेत अर्थसहाय्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे.


कारखाने व उद्योगांना बळ


उद्योग व कारखाने चांगले चालत असताना व बँक पातळीवर चांगली पत, क्षमता असतानाही त्यांना वाजवी व्याजदरात पुरेसा व वेळेत कर्ज पुरवठा होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच केडीसीसी बँक शेतीसह साखर कारखानदारी, सूत गिरण्या व आता औद्योगिक कर्जपुरवठ्यातही उतरत आहे. तसेच निर्यातक्षम उद्योग, परदेशी शिक्षण, स्वयंरोजगार, शासन अनुदानाच्या योजना अशा अनेक योजनातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून थेट व संस्थामार्फत अर्थसाह्य दिले जात आहे.


यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार राजेश पाटील,  ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, रणवीरसिंग गायकवाड, सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते. तसेच; बिगर शेती कर्जे व लवाद विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, अकाउंट बँकिंग विभागाचे व्यवस्थापक विकास जगताप, शेती कर्जे विभागाचे व्यवस्थापक चंद्रकांत रावण, व्यक्तिगत कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर आदी अधिकारी उपस्थित होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या