Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसने बाजी मारली असून काँग्रेसने 15 जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज दिली आहे.

Kolhapur ZP Election Result: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मते दिली आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी पावले टाकली होती. त्यानुसार त्यांच्या भेटीगाठी सुद्धा सुरू होत्या. अजितदादांच्या या भेटीगाठी सुरू असतानाच 28 जानेवारी रोजी त्यांचं बारामती विमानतळावर भीषण विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला कोल्हापूरमध्ये मोठ यश मिळालं आहे.
काँग्रेसने 15 जागा पटकावल्या
कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा मिळाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेससाठी गुलाल हा दुरापास्त झाला होता. मात्र ही कसर भरून निघाली आहे असं म्हणावं लागेल. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसने बाजी मारली असून काँग्रेसने 15 जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज दिली आहे. दुसरीकडे पक्षीय बलाबलामध्ये महायुती एकत्र आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेडपी अध्यक्ष निश्चित आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरकरांनी मतांमधून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद पक्षीय अंतिम बलाबल
- राष्ट्रवादी 20
- काँग्रेस 15
- भाजप 12
- शिवसेना 9
- जनसुराज्य 6
- रा. शाहू आघाडी 4
- स्वाभिमानी शेतकरी संघटना 1
- शिवसेना उबाठा 1
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर होणार
कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी महायुती कायम राहिल्यास कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेडपी अध्यक्ष होईल, असा विश्वास नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला होता. कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या होत्या. त्याचा फायदा निवडणुकीमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, भाजपला मात्र अवघ्या 12 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेना शिंदे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. जनसुराज्याला सहा जागा मिळाल्या आहेत. आमदार राजेंद्र पाटील प्रणित राजर्षी शाहू आघाडीला चार जागा जिंकल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळाली आहे, शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा एकच जागा मिळाली.
इतर महत्वा्च्या बातम्या
























