Dhananjay Mahadik: कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता आली असली तरी अध्यक्षपदावरून तसेच विविध समित्यांच्या वाटपावरून महायुतीमध्ये मीठाचा खडा पडणार का? अशी चर्चा रंगली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचाच झेडपी अध्यक्ष होणार असे संकेतच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. मात्र, आता अध्यक्षपदावर भाजपकडूनही दावा करण्यात आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी मतदान मात्र भाजपला जास्त झाल्याचा दावा करत अध्यक्षपदाची मागणी केली आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदावरून तसेच समित्यांच्या वाटपावरून महायुती जुंपण्याची चिन्हे आहेत. 

Continues below advertisement

आम्हाला देखील अध्यक्षपद आणि समित्या मिळाल्या पाहिजेत

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मोठा भाऊ कोण यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. खासदार महाडिक यांनी मतांचे गणित मांडलं आहे. सर्वाधिक जागा निवडून आल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल असे स्पष्टपणे मुश्रीफ यांनी सांगितल्यानंतर आता महाडिक यांनी म्हटलं आहे की भाजपला सर्वाधिक तीन लाख 42 हजार मते मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीला तीन लाख 41 हजार मते मिळाली आहेत. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस आहे. त्यामुळे भाजप हा मोठा भाऊ आहे. जिल्ह्यातील जनेतनं भाजपवर विश्वास ठेवला आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र बसणार आहोत, तर आम्हाला देखील अध्यक्षपद आणि समित्या मिळाल्या पाहिजेत, असे महाडिक यांनी नमूद केले. 

'तर आम्ही विचार करु' सतेज पाटलांचे सूचक विधान

दरम्यान, निकालानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांनी मदत मागितली तर विचार करू, असे सूचक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बहुमत दिसत आहे, मात्र ते महायुती म्हणून लढले आहेत. हसन मुश्रीफ स्वतंत्र लढले असते तर कदाचित विचार करता आला असता. मुश्रीफ साहेब अध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढले आणि त्यांनी मदत मागितली तर विचार करू. 

Continues below advertisement

कोल्हापूर जिल्हा परिषद पक्षीय अंतिम बलाबल

  • राष्ट्रवादी 20 
  • काँग्रेस 15 
  • भाजप 12 
  • शिवसेना 9
  • जनसुराज्य 6
  • रा. शाहू आघाडी 4
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना 1
  • शिवसेना उबाठा 1

पक्षीय बलाबलामध्ये महायुती एकत्र आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेडपी अध्यक्ष निश्चित आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरकरांनी मतांमधून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या