कोल्हापूर : दोन सरकारी विभागांमध्ये समन्वय नसेल तर विकास कामांची कशी वाट लागते याचा अनुभव सध्या कोल्हापूरकर घेत आहेत. सरकारनं 100 कोटी रुपये खर्चून काही भागात रस्ते बांधले. पण महापालिका हे नवे रस्ते ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या कामासाठी खोदून ठेवत आहे. आधीच निकृष्ट रस्ते आणि त्यातून पावसाळा यामुळं नव्या रस्त्यांची वाट लागल्याचं चित्र कोल्हापुरात आहे.
सरकारी यंत्रणांत समन्वयाचा अभाव, पैशांचा चुराडा, 100 कोटींचे रस्ते आधीच निकृष्ट त्यात खोदाई. ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम, रस्ते खोदण्यापूर्वी मनपाला कामं आठवली नाही का? सामान्यांना कळते ते मनपाच्या अभियंत्यांना कळत नाही का? असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत आहेत.
पावसात रस्ते उखडून गेले
कोल्हापुरात पावसाळ्यापूर्वी बांधलेल्या रस्त्यांची अवस्था ही अत्यतं वाईट झाली आहे. जिथं रस्ता गुळगुळीत करण्यासाठी फक्त वरवरचा मेकअप केला, तिथं पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खडी बाहेर निघाली. जिथं रस्ता मजबूत केलाय ते रस्ते महापालिकेनं ड्रेनेजच्या कामासाठी खोदून ठेवलेत. आयआरबीने बांधलेले रस्ते अजूनही मजबूत आहेत, पण पावसाळ्याच्या तोंडावर बांधलेले रस्ते उखडून गेले आहेत.
सरकारनं त्यासाठी 100 कोटी खर्च केले, पण कोल्हापुरकरांना चांगले रस्ते काही मिळाले नाहीत. खरं तर शहरातल्या रस्त्यांसाठी कधी नव्हे एवढा निधी सरकारनं दिला. या निधीमधून दर्जेदार आणि चकचकीत रस्ते होतील वाटलं होतं. पण कोल्हापूरकरांचा भ्रमनिरास झाला.
महापालिकेचे डोळे कधी उघडणार?
जूनच्या पावसातच रस्त्यांची पोलखोल झाली. खडी बाहेर आल्यामुळं अपघाताच्या घटनाही घडू लागल्यात. त्यामुळं केवळ मंत्री आल्यानंतरच कोल्हापूरच्या रस्त्यांची डागडुजी होणार का? सामान्य नागरिकांचा जीव घेतल्यानंतरच अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का? असा संतप्त सवाल लोक विचारत आहेत.
तब्बल 100 कोटीच्या या निधीमधून शहरात जवळपास 50 किलोमीटरचे रस्ते तयार केले जात आहेत. काही भागांत रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने बांधले आहेत, नाही असे नाही. पण नियोजनाच्या अभावामुळं रस्ता बांधल्यानंतर महिन्याभरातच ड्रेनेजच्या कामासाठी ते खोदून ठेवलेत.
मिरजकर तिकटीपासून संभाजीनगरला जाणारा रस्ता अनेक वर्षांच्या मागणीनंतर पूर्ण झाला. मात्र टिंबर मार्केट परिसरामध्ये ड्रेनेजचे लिकेज काढण्यासाठी 100 मीटर रस्त्याची जागोजागी खोदाई केली.
आपटे नगर परिसरात देखील अशीच परिस्थिती आहे. 20 वर्षानंतर रस्त्याने डांबर बघितलं. मात्र अवघ्या दोन महिन्यांत ड्रेनेजच्या कामासाठी या रस्त्याची खोदाई केली. कॉलनीतल्या लोकांनी पालिकेचे मजूर आल्यानंतर त्यांना परतवून लावले आणि ड्रेनेजचं काम करायचं होतं तर रस्ता बांधण्यापूर्वी का केलं नाही असा सवाल केला.
कंत्राटदारावर वचक नाही
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांवर वचक नाही. त्यामुळंच पाणीपुरवठ्याची आणि ड्रेनेजची कामं होण्याआधीच रस्त्यांची कामं करुन ठेवली. आता हे खोदलेले रस्ते त्याच कंत्राटदाराकडून बांधून घेणार का? की त्याच्यासाठी नवे टेंडर काढणार असा सवाल कोल्हापूरकर करत आहेत.
ही बातमी वाचा: