Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने (Kolhapur Rain Update) झोडपून काढलं आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या पावसामुळे चांगलीच दैना झाली आहे. कोल्हापूर शहर परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अक्षरशः शहराला झोडपून काढले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. सकल भागांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं. महाद्वार रोडवर नवीन रस्त्यावर पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झालं होतं. हाॅकी स्टेडियम ते विश्वपंढरी रोड सुद्धा ड्रेनेज फुटल्याने अक्षरश: तुंबला होता. त्यामुळे वाहनधारकांची कसरत सुरु होती. कोल्हापुरात तब्बल 35 ठिकाणी झाडे कोसळून रस्त्यावर पडली. जोरदार पावसाने कोल्हापुरातील परिख पूल सुद्धा तुंबला होता.
कसबा बावड्यात पंचगंगा नदी फेसाळली
जयंती नाला मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्याने ते पाणी जाऊन मिसळलं त्यामुळे पंचगंगा नदीत मिसळले. पंचगंगा नदी पूर्णपणे फेसाळली असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूरची दैना इतक्या वाईट पद्धतीने होत असेल तर अजून पावसाळ्याचे दिवस बाकी असल्याने कोल्हापूरमधील नालेसफाईचा मुद्दा चिंतेचा विषय झाला आहे. कसबा बावडा परिसरातील राजाराम बंधारा इथल्या पंचगंगा नदी पात्रामध्ये प्रदूषणामुळे फेस तयार झाला आहे. नदीपात्रावर मोठ्या प्रमाणात फेस तयार झाल्याने नदीतील जलचर प्राण्यांना धोका निर्माण झालेला आहे. नदीपात्रातील वाहत्या पाण्यामुळे प्रदूषणामुळे तयार झालेला हा फेस आता इचलकरंजीच्या दिशेने जात असल्याने त्या परिसरातील नागरिकांना देखील याचा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अवघ्या कोल्हापूरचा परिसर जलमय
कोल्हापूर शहरात मुसळधार पावसाने निम्म्या शहरात पाणी तुंबले. गटारी सुद्धा तुंबून वाहत असल्याने अनेक ठिकाणी तळी निर्माण झाली होती. कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, ताराराणी पुतळा, लक्ष्मीपुरी, मिरजकर तिकटी या परिसरात रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे नव्याने झालेल्या रस्त्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे सोयीपेक्षा गैरसोय झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला.
इतर महत्वाच्या बातम्या