Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी सुरु असल्याने पाणीपातळी संथगतीने कमी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अजूनही 24 बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. कुंभी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने 570 क्युसेकने कुंभी नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अजूनही उघडेच असल्याने भोगावती नदीपात्रात 4 हजार 256 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी आणि आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. 


राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 


दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी अधूनमधून सुरु होत्या. पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे राधानगरीच्या स्वयंचलित तीन खुल्या दरवाजांपैकी एक दरवाजा बंद झाला आहे. धरणातून सध्या 4 हजार 256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कासारी प्रकल्प 85 टक्के भरला असून 250 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 5 इंचापर्यंत आली आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.


चांदोली धरणातून विसर्ग वाढवला


दरम्यान, चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणामध्ये 85.15 टक्के पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. पाणलोट क्षेत्रातून 9 हजार 169 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. सध्या धरणातून 8 हजार 85 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरु आहे. चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने वारणा नदीची पाणीपाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली



  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. 

  • भोगावती नदी : तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.

  • कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे.

  • वारणा नदी : चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची व शिगांव.

  • दूधगंगा नदी : दत्तवाड 

  • तुळशी नदी : बीड


जिल्ह्यातील धरण पाणीसाठा


राधानगरी - 8.25 (8.361 टीएमसी), तुळशी 2.33 (3.471 टीएमसी), वारणा 29.28  (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 18.28 (25.393 टीएमसी), कासारी 2.40 (2.774 टीएमसी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.34 (2.715 टीएमसी), पाटगाव 3.14 (3.716 टीएमसी), चिकोत्रा 1.14 (1.522 टीएमसी), चित्री 1.69 (1.886 टीएमसी), जंगमहट्टी 1.16 (1.223 टीएमसी), घटप्रभा 1.56 (1.560 टीएमसी), जांबरे 0.82 (0.820 टीएमसी ) आंबेओहोळ 1.19 (1.240 टीएमसी ) आणि कोदे ल. पा. 0.21 (0.214 टीएमसी). 


इतर महत्वाच्या बातम्या