Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur News) गेल्या पाच दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावत पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदी पावसाचा जोर कायम राहिल्यास इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. आज (23 जुलै) सायंकाळी सहापर्यंत 38 फुट 4 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फुट आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजच्या दिवसासाठी (23 जुलै) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर 24 ते 26 जुलै या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 


या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुढील 48 तासांसाठी सर्वसाधारण अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण कोकण, गोवा, तसेच कोल्हापूरच्या घाट क्षेत्रासाठी सर्वसाधारण अलर्ट देण्यात आला आहे. मोठा पाऊस सुरू असताना घाट रस्त्यांनी प्रवास टाळावा, धबधब्यांच्या ठिकाणी थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूरसह  सिंधूदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यासाठी दरडींची पूर्वसूचना देण्यात आली आहे.






कोणत्या संभाव्य घटना होण्याची शक्यता?


डोंगरावरून दगड, माती वाहून येणे, झाडे कोसळणे, भिंती पडणे, रस्ता खचणे, पाणी साचणे, फ्लॅश फ्लडसारख्या संभाव्य घटना होण्याची शक्यता आहे. 


ही आहेत दरड प्रवण क्षेत्र तसेच रस्ते


आंबा, पोमेंडी, भुईबावडा, गगनबावडा-करुळ, फोंडा, आंबोली,  तिलारी, चोरला, अनमोड, इन्सूली, सावंतवाडी, मायनेवाडी, देवळी, बिलवास, मसुरे, आम्रड पेडणे, पारगड- नामखोल, ऐनी  आणि चंडगड 


करुळ घाटात भला मोठा दगड रस्त्यावर


दुसरीकडे, करूळ घाटात शनिवारी पहाटे भला मोठा दगड रस्त्यावर घसरून आला होता. त्यामुळे वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर कोसळलेली दरड हटविण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर कोसळलेला अवाढव्य दगड हटविण्यात आला. याशिवाय काही ठिकाणी पडलेल्या दरडी देखील हटविण्यात आला. करूळ घाटाप्रमाणे भुईबावडा घाटातही दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. परंतु, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे 19 जुलैला रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील लाटवण व तुळशी घाटात दरड कोसळून मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या