कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर (Kolhapur News) शहराला काळम्मावाडी धरणातून मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित थेट पाईपलाईन (Direct Pipeline) योजना पूर्णत्वास जात आहे. या योजनेतील 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. याच थेट पाईपलाईन योजनेचे लोकार्पण दसरा ते दिवाळी दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज कोल्हापुरात दिली. योजनेच्या लोकार्पणसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदाच्या दिवाळीत त्याच पाण्याने शहरवासीयांना अभ्यंगस्नान करण्याची संधी देणार असल्याचे ते म्हणाले. अमृत योजनेतील रखडलेली कामेही मार्चअखेर पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्याची सूचनाही मनपा प्रशासनाला केली. 


पालकमंत्री असताना पाणी कोल्हापूरकरांना मिळतंय हे भाग्य समजतो


पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर शहराशी निगडीत 21 विषयांचा आढावा घेतला. यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले की, पंचगंगा नदीचे प्रदूषित पाणी प्यायला लागत आहे. त्यामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन राबवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी योजनेला मान्यता दिली होती. आज घडीला ही योजना अंतिम टप्प्यात आहे. विजयदशमीदिवशी हे पाणी पुईखडीच्या ठिकाणी येईल. 48 किमी लांबीच्या पाईपची चाचणी झाली आहे. एकूण 97 टक्के काम झाले आहे. या योजनेतून दसऱ्याला पुईखडीच्या टाकीत पाणी पडेल. त्यानंतर लगेच लोकार्पण केले जाईल. मी पालकमंत्री असताना हे पाणी कोल्हापूरकरांना मिळतंय हे माझं भाग्य समजतो. 


ज्या कामांसाठी स्थानिक निधी आवश्यकता असेल तो जिल्हा नियोजनमधून दिला जाईल. त्याव्यतिरिक्त अन्य विषयांसाठी केंद्र, राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. थेट पाईपलाईनसाठी ‘तारीख पे तारीख’ नक्कीच होणार नाही. शंभर टक्के दिवाळीला पाणी मिळेल. लोकार्पणासाठी प्रोटोकॉलनुसार सर्व आमदारांना बोलवावेच लागेल, असे सांगत पालकमंत्री मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या या योजनेचे श्रेय कोणाचे यापेक्षा जनतेला पाणी मिळणे महत्त्वाचे आहे, असे सांगून श्रेयवादावर बोलण्याचे टाळले. 


कोल्हापूर शहरात 100 इलेक्ट्रिक गाड्या आणाव्या लागतील


ते पुढे म्हणाले की, घनकचऱ्यासाठी सरकारकडून जो निधी लागेल तो दिला जाईल. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी जो निधी मंजूर आहे तो निधी लवकरच दिला जाणार आहे.  कोल्हापूर शहरात 100 इलेक्ट्रिक  गाड्या आणाव्या लागतील, त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. इलेक्ट्रिक गाड्या आल्याशिवाय केएमटी तोट्याच जायचं थांबणार नाही. परिख पूल दुरुस्तीसाठी 3 कोटी 88 लाख दिले जाणार आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी सर्व रस्ते चकाचक केले जातील. 


इतर महत्वाच्या बातम्या