कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Police) शांततेत गणेशोत्सव पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून तब्बल सात हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. चोख बंदोबस्तासह सणात व्यत्यय निर्माण करणाऱ्यांची यादी तयार करून, त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईसाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. 


एकुण 6 हजार 850 जणांविरुद्ध फौजदारी प्रक्रियेनुसार कारवाई 


पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार गणेशोत्सवात व्यत्यय निर्माण करण्याची शक्यता आहे अशा 3816 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 2219 जणांकडून चांगल्या वर्तणुकीच्या जामीनासह बॉन्ड घेण्यात आले आहेत. 171 जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉन्ड घेणेत आलेले आहेत. तिघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सणाच्या कालावधीत हद्दीमध्ये, मंडळाजवळ अथवा मिरवणुकीमध्ये प्रवेश करणेस 641 जणांवर मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अशा एकुण 6 हजार 850 जणांविरुद्ध फौजदारी प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात आली आहे.


दोन टोळ्यांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव


त्याचबरोबर गणेशोत्सवामध्ये व्यत्यय अथवा बाधा निर्माण करणाऱ्या दोन टोळ्यांविरोधात जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश पारित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एकुण हद्दपारीचे 31 प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे स्थानबध्दतेसाठी 3 प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. वारंवार कारवाई करुनही बेकायदेशीर दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या 111 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करणेत आलेले व सध्या हद्दपारी आदेशाच्या अंमलाखाली असलेल्या 52 जणांवर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. त्यांनी आदेशाचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


कोल्हापुरात  साउंड सिस्टीमच्या दणदणाटावर गणरायाचे आगमन 


दुसरीकडे, काल (19 सप्टेंबर) साउंड सिस्टीमच्या दणदणाटात राजारामपुरीत गणेश आगमन मिरवणूक पार पडली. मिरवणुकीसाठी पोलिसांनी एकच मार्ग केल्याने शिस्त लागली, पण उत्साही कार्यकर्त्यांमुळे रेंगाळली गेली. 43 मंडळांनी सहभाग घेतला, महिलांचा सहभागही लक्षणीय होता. रात्री 12 वाजता पोलिसांनी मिरवणुकीतील साऊंड सिस्टीम नियमाप्रमाणे बंद केल्या. सायंकाळी पाच वाजता महापालिकेच्या 9 नंबर शाळेपासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. तेथून राजारामपुरी पोलिस चौकी, जनता बझार चौक, राजारामपुरी मुख्य रस्ता आणि तेथून मारुती मंदिर असा मिरवणुकीचा मार्ग होता. पोलिसांनी दिलेल्या क्रमानुसार मंडळांनी गणेशमूर्ती असणारे सजवलेले ट्रॅक्टर रांगेत उभे केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या