कोल्हापूर : विधानसभेच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट झाला आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसचे बंडखोर राजू लाटकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला नसल्याने मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. 


कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी सुरूवातीला काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू लाटकर यांचे नाव जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये काँग्रेसने त्यांचा उमेदवार बदलला आणि मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव जाहीर करण्यात आलं. त्यानंतर राजू लाटकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता. 


शेवटच्या क्षणापर्यंत राजू लाटकर यांची मनधरणी करण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश आलं नव्हतं. राजू लाटकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यास ठाम होते. त्यानंतर शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला अर्ज मागे घेतला. 


शाहू महाराज काय म्हणाले? 


मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही,ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही."


मानसिक स्थिती बरोबर नाही, मालोजीराजेंची प्रतिक्रिया


मधुरिमाराजेंनी माघार घेतल्यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली. आपली मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं ते म्हणाले. मधुरिमाराजेंनी माघार नेमकी का घेतली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. 


ही बातमी वाचा: