Kolhapur News : किल्ले पन्हाळगडावर (Panhala Fort) गेली अनेक वर्ष नगरपालिकेच्या दारात असणाऱ्या तोफांना आज (1मे) तोफगाड्यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली. शिवराष्ट्र परिवार मार्फत पन्हाळगडावर दिमाखदार तोफगाडे लोकार्पण सोहळा पार पडला. बाल शिवाजी, जिजाऊ, मावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्याला एक वेगळे ऐतिहासिक स्वरूप लाभले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव घोषणाने पन्हाळगड यावेळी दुमदुमून गेला. शिवभक्तीचा प्रचंड उत्साह, सजवलेले तोफगाडे, भगवे झेंडे अशा उत्साही वातावरणात तोफांना महाराष्ट्र दिनी तोफगाड्यांच्या माध्यमातून मोठा सन्मान मिळाला. पन्हाळा नगरपालिकेच्या आवारात गेले अनेक वर्ष तोफा ऊन, वारा, पावसात होत्या. या तोफांना आता नव्याने सौंदर्याचा साज चढवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सन्मानाने त्या विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे स्वप्नपूर्ती झाल्याने पन्हाळावासियांसह शिवभक्तामध्ये मोठा आनंद आहे. 


शिवराष्ट्र परिवाराने तोफांचे केलेले संवर्धन खरोखरच स्तुत्य


प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रमेश शेंडगे, नगरपालिका मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, निवासी नायब तहसीलदार विनय कौलवकर, माजी नगराध्यक्ष रूपालीताई धडेल, रवींद्र धडेल, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, जिल्हाध्यक्ष मोहन खोत, मोहीम प्रमुख गणेश कदम, श्रेयश भंडारी, अतुल कापटे, स्वीकृत माजी नगरसेवक अँड रवींद्र तोरसे, दिनकर भोपळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा झाला. प्रांताधिकारी समीर शिंगटे म्हणाले, पन्हाळगडाला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. शिवराष्ट्र परिवाराने तोफांचे केलेले संवर्धन खरोखरच स्तुत्य आहे. पन्हाळगड संवर्धनासाठी जे काही करावे लागेल ते शासन पातळीवर आपण करू.


तोफांसह तोफगाड्यांचे संवर्धन होण्यासाठी कायमस्वरुपी छत


मुख्याधिकारी चेतनकुमार माळी म्हणाले, तोफांसह तोफगाड्यांचे संवर्धन होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे कायमस्वरूपी छत उभारले जाईल. शिवप्रेमींना हा पाच तोफांचा ऐतिहासिक ठेवा कायमस्वरूपी पहावयास मिळेल. शिवराष्ट्राचा गड संवर्धनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे माजी नगराध्यक्ष रूपालीताई धडे म्हणाल्या. यावेळी तोफ कारागीर राजाराम सुतार आणि बाळकृष्ण सुतार यांच्यासह हानीफ नगारजी यांचा सत्कार झाला. यावेळी दिंडनेर्ली संयुक्त शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य अमर पाटील, सुनील जाधव, राहुल पवार, धैर्यशील कदम, अभिजीत पवार, शुभम पांढगळे आदी उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या