कोल्हापूर : विकेंडपासून ते 16 ऑगस्टपर्यंत सुट्ट्या जोडून आल्याने प्रवाशांची गर्दी असताच महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात मोठी गैरसोय झाली आहे. जळगाव-भुसावळ विभागामध्ये ब्लॉक घेऊन तिसरा रेल्वेमार्ग आणि यार्ड रिमॉडेलिंगशी संबंधित आवश्यक तांत्रिक कामे केली असल्याने 12 आणि 14 ऑगस्टला सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 11039) तसेच 13 ऑगस्टला सुटणारी नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12114), जबलपूर-पुणे एक्स्प्रेस (02132) रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापुरातून सुटणारी आज शनिवार (दि. 12) व सोमवारी (दि.14), तर गोंदियातून सोमवार, 14 आणि 15 तसेच 16 रोजी सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
प्रामुख्याने 14 आणि 15 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक असला तरी 13 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मनमाड रेल्वे स्थानकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या 33 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या असून, 19 प्रवासी रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
आरक्षण केलेल्यांचे गाडी रद्द झाल्याने मोठी गैरसोय
सुट्टीच्या कालावधीत विशेषत: सर्वाधिक लांब पल्ल्याच्या असणार्या गाडीला प्रवाशांची मोठी मागणी असते. विकेंडला सलग सुट्ट्या जोडून आल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेसला गर्दी आहे. त्यामुळे हे नियोजन लक्षात आगाऊ आरक्षण केलेल्यांचे गाडी रद्द झाल्याने मोठी गैरसोय झाली आहे. आरक्षणाचे पैसे परत मिळणार असले तरी सुट्ट्यांच्या कालावधीत केलेले नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. रेल्वे रद्द झाल्यानंतर खासगी बसवाल्याकंडून होणारी लूट नव्याने सांगण्याची गरज नाही.
दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी सुटणारी पुणे-नागपूर (12113), पुणे-जबलपूर (02131), नागपूर-पुणे (12136), गोंदिया-कोल्हापूर (11040 ) तसेच 15 ऑगस्टला सुटणारी पुणे-नागपूर एक्स्प्रेस (12135) सुध्दा रद्द करण्यात आली आहे. 16 ऑगस्टला सुटणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसही (11040) रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोणत्या गाड्यांच्या मार्गामध्ये बदल?
13 ऑगस्टला सुटणारी दानापूर-पुणे एक्स्प्रेस (12150), जसिडीह-पुणे एक्स्प्रेस (11428 ), हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस (12130) जळगाव- वसईरोड-लोणावळा या मार्गावर धावेल. 13 ऑगस्टला सुटणारी जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस (11078) जळगाव-वसईरोड-कल्याण-लोणावळा या मार्गे धावेल. 14 ऑगस्टला निघणारी हजरत निजामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेस (12782) इटारसी-नागपूर-बल्लारशाह या परिवर्तितमार्गे धावेल.
14 ऑगस्टला सुटणारी पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12221) आणि हावडा-पुणे (12129) लोणावळा-पनवेल-वसईरोड-उधना-जळगाव या मार्गाने धावेल. 14 ऑगस्टला सुटणारी पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस (11077), पुणे-दानापूर एक्स्प्रेस (12149), वास्को-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) लोणावळा-वसईरोड-उधना-जळगाव या परिवर्तितमार्गे धावेल.
इतर महत्वाच्या बातम्या