कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाडिक कुटुंबाची तयारी विचाराल, तर आमची तयारी आहे. पण याबद्दल आताच बोलणं योग्य होणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली आहे.
...तर आम्ही त्यांचा प्रचार करू
धनंजय मडाडिक यांनी लोकसभा निवडणुकीवर बोलताना सांगितले की, भाजप हा जगभर नावलौकिक असलेला पक्ष आहे. राज्यात 48 जागांची तयारी भाजप करत आहे त्यामध्ये लपवून ठेवण्याचे कारण नाही. कोल्हापुरात दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच निवडणुका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जाणार असल्याचे सांगितले आहे. लोकसभेला हे समीकरण कसे असेल हे माहीत नाही. या दोन्ही जागा शिंदे गटाला गेल्या, तर आम्ही त्यांचा प्रचार करू. वेगळा विचार झाला तर पक्षाचा आदेश पाळू. लोकसभेसाठी महाडिक कुटुंबाची तयारी विचाराल तर आमची तयारी आहे पण याबद्दल आताच बोलणं योग्य होणार नाही. हा सर्वस्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असतो.
काँग्रेसने शड्डू ठोकला, पण मातब्बर आखाड्यात उतरण्यास तयार होईनात
दरम्यान, कोल्हापूर लोकसभा जागेवर काँग्रेसने दावा केला असला, तरी त्यांच्याकडून कोणीही तगडा उमेदवार उमेदवारीसाठी तयार होत नसल्याने जागेसाठी शड्डू ठोकला, पण प्रत्यक्ष आखाड्यात माती लावून घेणार तरी कोण? अशी स्थिती आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सर्वाधिक प्राबल्य आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये या जागेवर काँग्रेसने दावा केल्यास ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि पी. एन. पाटील (P. N. Patil) एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा या जागेसाठी प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, एकमेव सेना आमदार प्रकाश आबिटकर शिंदे गटात आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद कमकुवत झाली आहे. दुसरीकडे, मतदारसघांमध्ये राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शरद पवार गटाची ताकद सुद्धा मर्यादित झाली आहे.
पण भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये
दुसरीकडे, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन्ही ठिकाणी आपल्याच पक्षाचा उमेदवार असावा अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केली. मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला आहे. दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिंदे गटात गेले असले, तरी मतदार हा ठाकरेंसोबत आहे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
वेळ आली तर स्वबळाची तयारी सुद्धा पक्षाची असली पाहिजे
दोन्ही लोकसभा मतदारसंघात काहीही होऊ द्या, पण भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना दिल्या. ते म्हणाले की, आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. इंडिया आघाडीत निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मात्र, कोणत्याही परिस्थितीसाठी आपल्या पक्षाने तयारी करावी. वेळ आली तर स्वबळाची तयारी सुद्धा पक्षाची असली पाहिजे, अशी आपली तयारी आतापासूनच सुरू करा असे ठाकरे यांनी नेत्यांना आढावा बैठकीत सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या :