कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर भीती गादीची म्हणून सभा मोदीची असे कॅम्पेन महाविकास आघाडीकडून जोरदार सुरु आहे. यावरून आता महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीकडून होत असलेल्या प्रचारावर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पलटवार केला आहे. 


शाहू महाराजांचा अपमान केला


हसन मुश्रीफ म्हणाले की, शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभा करून महाविकास आघाडीने अपमान केला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूरच्या सभेवर टीका केल्यानंतर त्याला मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. महाविकास आघाडीला शाहू महाराजांचा सन्मान राखायचा होता, तर राज्यसभा का दिली नाही? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. मान गादीला आणि मत मोदीला असं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 


शाहू महाराज यांचा सन्मान राखला नाही


'भीती गादीची म्हणून सभा मोदीची' महाविकास आघाडीच्या या टीकेला भाजप नेते धनंजय महाडिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, कोल्हापूरमध्ये मान गादीला आणि मत मोदीला हे ठरलं आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने प्रचार महाविकास आघाडी कडून केला जात आहे. महाविकास आघाडीने शाहू महाराज यांचा सन्मान राखला नाही, शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी येणे अपेक्षित होतं. मात्र, त्यापैकी कोणीही उपस्थित राहिलं नाही. उलट महाविकास आघाडीने छापलेल्या पॅम्प्लेटवर राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे फोटो नाहीत, याचा अर्थ राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावाने मते मिळणार नाहीत, हे महाविकास आघाडीला माहिती झालं असल्यची टीका त्यांनी केली. 


म्हणून उमेदवारीची माळ महाराजांच्या गळ्यात


माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, स्वतःला निवडणूक हारण्याची भिती होती म्हणून उमेदवारीची माळ महाराजांच्या गळ्यात दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वतःला मसिहा समजणाऱ्या तथाकथित काँग्रेसला नेत्याला ही निवडणूक हरणार समल्यावर उमेदवाराची माळ महाराजांच्या गळ्यात टाकली, अशी टीका त्यांनी केली. या काँग्रेस नेत्याच्या भुलथापांना शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे बळी पडलेच कसे असा प्रश्न उपस्थित होतो, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या