Deepak Kesarkar: श्री क्षेत्र कुंथुगिरी हे शांततेचा संदेश देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राचा विकास कुंथूसागर महाराजांच्या विशेष प्रयत्नातून झालेला आहे. या परिसराचा अधिक चांगला विकास व्हावा आणि भाविकांसाठी अधिक पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजन समितीतून या क्षेत्राच्या विकासासाठी एक कोटीचा निधी देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. केसरकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गणाधिपती कुंथूसागर महाराज अन्नछत्र कोनशिला ठेवण्याचा समारभं संपन्न झाला.


कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) आळते (ता. हातकणंगले) येथील श्री कुंथूगिरी क्षेत्रावरगणाधिपती गणधराचार्य कुंथूसागर विद्या शोध संस्थेच्यावतीने श्री कुंथूसागर महाराज यांचा जगद्गुरु वर्ष वर्धन महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार सर्वश्री कल्लाप्पाण्णा आवाडे, राजू शेट्टी, कोषाध्यक्ष हिरालाल गांधी, माजी आमदार सुजित मिणचेकर, आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले, उपसरपंच अमित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर जैन धर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपये निधी देण्यात येणार


केसरकर पुढे म्हणाले की, जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या जैन धर्मियांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करूया असे आवाहन केले. कुंथूगिरी क्षेत्राच्या विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करुन देण्यार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांनी गणाधिपती कुंथूसागर महाराजांचे या खडकाळ डोंगरावर मंदिर बांधण्याचे स्वप्न होते ते पूर्ण झाले असून मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम अपुरे राहिलेले आहे त्या कामासाठी पालकमंत्री महोदयांनी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.


ज्या गावात तीर्थक्षेत्र विकसित केले त्या आळते गावाचा विकास करण्याचे कामही कुंथूसागर महाराजांनी केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.


इतर महत्वाच्या बातम्या :


औरंगजेबचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, मुस्लिम कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना इतिहास समजून सांगावा, आमदार हसन मुश्रीफांचे कळकळीचे आवाहन