Kolhapur Gokul Milk Price News : गोकुळ दूध संघाच्या प्रशासकाकडून गाईच्या दुधाच्या विक्रीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर दोन रुपयांनी विक्रीमध्ये वाढ केली आहे. म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये मात्र कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, गायीच्या विक्रीचा नवीन दर 21 मे पासून लागू होणार आहे. गोकुळवर प्रशासक आल्यानंतर पहिल्यांदाच विक्री दरामध्ये वाढ केली आहे. 

Continues below advertisement

नवीन दरवाढ ही 21 मे पासून करण्यात येणार

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांची गोकुळ प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्यानंतर प्रशासक मंडळाने आज मोठा निर्णय घेतला आहे. गोकुळच्या गाईच्या दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन दरवाढ ही 21 मे पासून करण्यात येणार आहे. 

याआधी देशातील सर्वांत मोठ्या अमूल आणि मदर डेअरीने दूध दरात केली वाढ

याआधी देशातील सर्वांत मोठ्या अमूल आणि मदर डेअरी या दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. आता गोकुळ दूध संघानेही दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचा वाढता दर, कच्च्या मालाच्या किंमती तसेच वाहतूक, पॅकेजिंग आणि इतर खर्चात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाने गाय दुधाच्या विक्री दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Continues below advertisement

गोकुळवर प्रथमच प्रशासकाची नियुक्ती

दरम्यान, दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी 16 मार्च 1963 ला गोकुळ दूध संघाची स्थापना झाली. गेल्या 63 वर्षात संघ जिल्ह्याच्या अर्थकारणाचे केंद्रबिंदू बनला. जिल्ह्याची शिखर संस्था केडीसीसी बँकेवर आतापर्यंत दोन वेळा प्रशासक आले, पण गोकुळवर प्रथमच प्रशासक येत असल्याने संघाशी जोडलेल्या सर्वच घटकांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. यापूर्वी 'केडीसीसी बैंक, 'बिद्री' व "भोगावती' कारखान्यांवर प्रशासकीय मंडळ आले होते. बँक असो वा साखर कारखाना त्यांचे कामकाज व दूध संघ यांच्यात फरक आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्याआधीच ज्या पद्धतीने आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता प्रशासकांनीही कामकाज करताना काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. आव्हान देऊन प्रशासक आणला जात असल्याने साहजिकच 'गोकुळ'च्या राजकीय विश्वात अस्वस्थता अधिक आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक मंडळाचे अध्यक्ष