Kolhapur Bajar Samiti Election : साखर कारखान्यांसह बाजार समित्यांच्या निवडणुकीत बरेच सर्वसामान्य मतदार मतासह चिट्टी सुद्धा मतपेटीत टाकून राग व्यक्त करत असतात. मात्र, कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भलताच प्रकार समोर आला आहे. मतासाठी देण्यात आलेले हजार रुपये एका प्रामाणिक मतदाराने पाकिटात आहे तसेच घालून मतपेटीत टाकून दिले आहेत. ते पैसे कोणी दिले याचा उल्लेख न करता त्यांनी ते निवडणूक आयोगाला पैसे परत पाठवून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मतांसाठी पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांना एकप्रकारे चपराक दिली आहे. मतपेटीत एका स्वाभिमानी मतदाराने मतासाठी मिळालेले हजार रुपये तसेच मतपेटीत टाकले होते. पाकिट उघडले असता त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळून आल्या.
महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल
दरम्यान कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. एकूण 18 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये सत्ताधारी गटाने 5 पाच ठिकाणी विजय मिळवला आहे. एक जागा अपक्षाकडे गेली असून एका ठिकाणी विरोधी गटाने विजय मिळवला आहे. ग्रामपंचायत गटातून सुयोग वाडकर आणि शिवाजीराव पाटील विजयी झाले आहेत. अनुसूचित जातीमधून नानासो कांबळे विजयी झाले आहेत, तर आर्थिक दुर्बल पांडुरंग काशीद विजयी झाले आहेत. हमाल-तोलाईदार गटातून अपक्ष उमेदवार माजी संचालक बाबूराव शंकर खोत हे 60 मतांनी विजयी झाले आहेत. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी सुरु आहे. सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी व शिव शाहू परिवर्तन शेतकरी विकास आघाडी या दोन आघाड्यात थेट लढत आहे.
दरम्यान, मतमोजणीसाठी एकूण 36 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. बाजार समिती निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्थेचे 14 हजार 133, ग्रामपंचायतीतील 5 हजार 733, अडते व्यापारी गटाचे मतदान 1217, माथाडी तोलाई गटाचे 894 मतदान आहे. यापैकी एकूण झालेले मतदान 20 हजार 280 मतदान झाले आहे. दरम्यान, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. उर्वरित 11 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यासाठी आज मतदान होत आहे. सेवा संस्था व ग्रामपंचायत या दोन गटातील 2 हजार पाचशे सभासद मतदार आहेत. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय, जयसिंगपूर येथील कुमार विद्या मंदिर येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्रे व कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालय येथे तीन मतदान केंद्रे असून एकूण सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार असून सायंकाळी पाचनंतर मतमोजणी केली जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
