कोल्हापूर: राज्याचं लक्ष लागून असलेल्या कागल नगरपालिका निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे दोन कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि समरजीत घाटगेंच्या नेतृत्वाखाली शाहू विकास आघाडीने युती केल्याने कागलचं राजकारण पलटल्याचं चित्र आहे. आम्ही एकत्र आलो ते कायम एकत्र राहण्यासाठी असं हसन मुश्रीफ म्हणाले. तर शरद पवारांची परवानगी घेऊनच आपण युती केली आहे, अदृश्य शक्तीचा आशीर्वाद असेल तर ही युती कायम टिकेल असं समरजीत घाटगे म्हणाले.
हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे नेते आहेत तर समरजीत घाटगे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. पण त्यांनी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यासाठी आपण शरद पवारांची चर्चा केली आहे, त्यांनी आपल्याला स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी परवानगी दिली असल्याचं समरजीत घाटगेंनी जाहीर केलं.
Kagal Nagarpalika Election : दोन्ही राष्ट्रवादी चलाखीने एकत्र
चंदगडनंतर कागलमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची चर्चा होती. पण कागलमधील आघाडी ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू विकास आघाडीमध्ये असल्याचं समरजीत घाटगे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी चलाखीने एकत्र आल्याची चर्चा सुरू आहे.
Samarjeet GhatgeOn Kagal : अदृश्य शक्तीचा आशीर्वाद असेल तर...
यावर बोलताना समरजीत घाटगे म्हणाले की, "कागल, मुरगुड नगरपालिकांच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. येत्या काळात एक चांगलं व्हिजन घेऊन आम्ही एकत्रितपणे सामोरं जात आहोत. या काळात चांगला कारभार आम्ही करू. जी ताकद आम्ही एकमेकांच्या विरोधात लावतो तीच ताकद आता शहराच्या विकासासाठी लावू."
कागल आणि मुरगूडमध्ये जो काही फॉर्म्युला ठरला आहे तो वरिष्ठ पातळीवर ठरला आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच आता त्याचं पालन करून पुढं गेलं पाहिजे असं आवाहन समरजीत घाटगेंनी केलं. हसन मुश्रीफ आणि आपल्यामध्ये चांगलं समन्वय असून कागलसाठी ही युती करण्यात आली आहे. कागलच्या विकासासाठी सत्तेच्या माध्यमातून विकास करू. कुणावरही अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असंही घाटगे म्हणाले.
हसन मुश्रीफांनी एक पाऊल पुढे टाकलं, आता आम्ही एक पाऊल पुढं टाकलं आहे. अदृष्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर ही युती कायम टिकेल अशी अपेक्षा आहे असं समरजीत घाटगे म्हणाले.
Hasan Mushrif On Samarjeet Ghatge : कायम एकत्र राहू
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, "हसन मुश्रीफ म्हणाले की, "कागल आणि मुरगुड नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीची युतीचा निर्णय झाला. कुणावरही अन्याय होणार नाही हे आम्ही पाहू. कागलच्या विकासासाठी संघर्ष सोडून हातात हात घालून काम करण्याची भूमिका घेतली आहे. आता ही युती झाली आहे, त्यामुळे आपले उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील हे कार्यकर्त्यांनी पाहावं. यावर कुणावर अन्याय होणार नाही हे आम्ही पाहू."
एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. भविष्यामध्ये तालुका आणि जिल्ह्यासाठी समरजीत घाटगे आणि माजी आमदार संजयबाबा घाटगेंसोबत राहू असं हसन मुश्रीफ म्हणाले.
Hasan Mushrif On Kagal : संजय मंडलिकांना अस्वस्थ होण्याची गरज नव्हती
हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकत्र आल्यानंतर त्यावर शिंदेंचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, "ज्या पद्धतीने संजय मंडलिकांनी भूमिका मांडली, त्यावर त्यांनी अस्वस्थ होण्याची गरज नव्हती. मुरगूडमध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं, कागलमध्ये त्यांची ताकद काही नाही. त्यामुळे ते काय बोलतात याकडे आम्ही जास्त लक्ष देणार नाही.ठ
या आधी कागलमध्ये अनेकदा वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले. या गोष्टी कागलसाठी काही नवीन नाहीत. राजकारणात शत्रूत्व करणे, द्वेष करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष करणे हे कागलमध्ये कधीही घडलं नाहीअसं मुश्रीफ म्हणाले.
ही बातमी वाचा:
