कोल्हापूर : लाचखोर जयराज कोळीची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच 15 लाखाची लाच घेताना साथीधारासह जयराज कोळीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे त्याच्या नियुक्तीनंतर आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जयराज कोळी हा सरकारी अधिकारी आणि कंत्राटदारांना माहिती अधिकाराचा अर्ज टाकण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करायचा. लाच घेताता तो रंगेहातही सापडला आहे. असं असतानाही लाचखोर जयराज कोळीला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने पद दिल्याने कोल्हापुरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेमधून जयराज कोळी याची याआधीच हकालपट्टी करण्यात आली आहे.

जयराज कोळी या स्वयंघोषित माहिती अधिकारी कार्यकर्त्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. खंडणी, धमकी आणि खोट्या चौकशांची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार त्याने वेळोवेळी केला आहे.

15 लाखांची लाच घेताना अटक

स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता जयराज कोळी याला जून महिन्यात 15 लाखाची खंडणी घेताना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. जयराज कोळी बरोबरच त्याचा साथीदार युवराज खराडेला देखील पोलिसांनी अटक केली.

औषधी उपकरणे पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला जयराज कोळी चौकशीचे खोटे अर्ज दाखल करून वारंवार त्रास देत होता. सगळे अर्ज मागे घेतो मात्र 20 लाख रुपये दे अशी मागणी जयराज कोळी यांने केली. शेवटी 15 लाखावर तडजोड झाली आणि कागलच्या लक्ष्मी टेकडीच्या जवळ हे पैसे देण्याचे ठरले.

फिर्यादीने आधीच या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे सापळा रचून पोलिसांनी जयराज कोळी आणि युवराज खराडेला पकडले. या दोघांवर देखील कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कामाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा धंदा

सामाजिक कार्याच्या नावाखाली जयराज कोळी याने ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला होता. सीपीआर मध्ये माहिती अधिकाराचे अर्ज टाकून संबंधित व्यक्तींना त्रास देत पैशाची मागणी केली जात असे. मात्र या प्रकरणात जयराज कोळी याचे कारनामे समोर आले. जयराज कोळी हा पूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पदाधिकारी होता.मात्र त्याचे हे कारनामे बघून प्रहार संघटनेमधून त्याचे हकलपट्टी करण्यात आली.

ही बातमी वाचा :