IT Raids In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात भागीदारीतून चालविल्या जाणाऱ्या साखर कारखानदाराच्या अर्जुनवाड आणि संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील निवासस्थानावर आयकर विभागाने छापेमारी केली. गुरुवारी (ता.25) सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू होती. सांगलीतील जागेचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली जात होती. आयकर विभागाच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. कारवाईचा अधिकृत तपशील मिळू शकला नाही.
शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबियातील महिलेच्या पतीकडून भागिदारीतून अन्य जिल्ह्यात साखर कारखाना चालविला जात आहे. कारवाई सुरू असलेल्या कुटुंबातील महिलेने तालुका सभापतीपद भूषवले आहे. महिलेच्या पतीचा गौण खजिनाचा व्यवसाय होता. शिवाय वाळू उपसा करण्यासाठी वापरात येणाऱ्या बोटी तयार करण्याचा व्यवसायही आहे.
त्याचबरोबर नांदेड, नाशिक, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यात भागिदारी आहे. कारखान्यातील काही भानगडीमुळे प्रमुखाची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर या प्रमुखाचा भागिदारी असलेल्याच्या घरावर गुरूवारी आयकर विभागाने छापा टाकला.
गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास अर्जुनवाड येथे दाखल झाले. या पथकाने घरातील सर्व कपाटे, विविध साहित्य, चार चाकी वाहने, जनावरांचा गोठा यासह विविध ठिकाणी असलेल्या कागपपत्रांची झाडाझडती केली. त्यानंतर दोन अधिकारी यासर्व कागदपत्रांची पडताळणी करीत होते. तर अन्य अधिकारी चौकशी करीत होते.
याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारच्या सुमारास या पथकाने आपला मोर्चा जयसिंगपूर, संभाजीपूर येथील असलेल्या आलिशान बंगल्याची पाहणी करून तपासणी केली. त्यानंतर सांगली येथील प्लॉटचीही पाहणी करण्यात आली. हे पथक दुपारी पुन्हा अर्जुनवाड येथे आले. आणि पुन्हा कागदपत्रांची जुळवाजूळव करून चौकशीचे काम सुरू होते.
काल रात्री उशीरापर्यंत आयकरचे अधिकारी या पती पत्नीकडून माहिती घेत आहेत. अधिकार्यांशी पत्रकारांनी माहिती विचारला असता. आम्ही आताच काही माहिती देवू शकत नसल्याचे सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या