Kolhapur News : प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षा पदक, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व पोलीस हवालदार नामदेव यादव यांना पोलीस दलातील राष्ट्रपती शौर्य पदक मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रातील गुणवंताचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
मुसळधार पावसात 41 मिनिटांमध्ये सलग 6 किमी स्केटींग करण्याचा विक्रम केल्याबद्दल आराध्या पद्मराज पाटील या चिमुकलीचा (वय 3 वर्ष 10 महिने) सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांना सैन्य सेवेत असताना युद्धजन्य परिस्थितीत अपंगत्व आल्याने ताम्रपट देण्यात येते. माजी सैनिक सुभेदार राजाराम सिद्धू कांबळे,13 महार रेजिमेंट व संभाजी बंडू पाटील, मेकानाइज् इन्फंट्री या दोघांना ताम्रपट व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. 5 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 3 कांस्यपदक पटकावणाऱ्या गगन गणपतराव देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. अजिंक्य पाटील यांचाही कांस्यपदक पटकावल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
विभागीय वन अधिकारी समाजिक वनिकरण विभाग, तसेच प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका, कोल्हापूर, शासकीय पूर्व प्राथमिक शिष्यवृती परिक्षेमध्ये राज्य गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवता यादीतील विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला. राज्यातील तसेच देशातील सर्वात लहान गिर्यारोहक इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड केलेल्या अन्वी चेतन घाटगे हिचाही सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात आयोजित विविध विभागाच्या पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, नियोजन समिती सदस्य अमित कामत यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी पत्रकार व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
258 कोटी निधी प्राप्त
दरम्यान, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23 अंतर्गत 425 कोटी इतकी तरतूद मंजूर आहे. यापैकी आतापर्यंत शासनाकडून 258 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. तर अनुसूचित जाती उपायोजनासाठी 116 कोटी 60 लाखाचा निधी मंजूर असून या अंतर्गत विविध लोकोपयोगी विकास कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच शासनाने दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले असून या विभागाचे काम लवकरच सुरू होऊन राज्यातील सर्व दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री केसरकर यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या