Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना कोल्हापूर महानगरपालिकेला गेल्या दीड महिन्यांपासून कोणी आयुक्त देता का आयुक्त? असा आक्रोश करायची वेळ आली आहे. कोल्हापूर पालिकेला फक्त आयुक्तच नव्हे, तर इतर पदेही रिक्त आहेत. मनपा प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांची बदली पुण्यामध्ये 2 जून रोजी झाली आहे. तेव्हापासून कोल्हापूर मनपा आयुक्तपदी नेमणूक झालेली नाही. बलकवडे यांनी कोल्हापूरची जबाबदारी अडीच वर्ष सांभाळली होती.
काळजीवाहू म्हणून सध्या आयुक्तपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार पाहत असले, तरी जिल्हाचं काम पाहून पुन्हा मनपा काम पाहताना पूर्णत: तारेवरची कसरत सुरु आहे. बहुदा राज्यातील कोल्हापूर महापालिका एकमेव असावी ज्या ठिकाणी आयुक्त नाहीत आणि इतर रिक्त पदांवरही अधिकारी नाहीत. त्यामुळे कोल्हापूरचे दुखणे पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिसत नाही की? स्वप्नांचा बाजार मांडणे हा त्यांचा प्रमुख कामकाजाचा भाग आहे, अशी शंका येऊ लागली आहे.
कोल्हापूरचे जयपूर करण्याच्या नादात आयुक्तपद विसरून गेले का?
केसरकर यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री पदावरून स्वप्नांच्या पुड्या सोडण्याचेच काम केले असून वास्तवात एकही भरीव काम त्यांना अजून कोल्हापुरात पूर्णत्वास नेण्यात यश आलेलं नाही. हद्दवाढ, खंडपीठ प्रश्न जैसे थे आहेत. भाजपनेही त्यांच्याविरोधात आवाज उठवताना हे तर पालकमंत्री नव्हे, पर्यटनमंत्री असल्याची बोचरी टीका केली होती. आयुक्तांची नेमणूक तातडीने करण्यात यावी, शिवसेना ठाकरे गटाकडून मागणी करत आंदोलन केले होते. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून एका शब्दानेही पालकमंत्री म्हणून दीपक केसरकरांनी शब्द काढलेला नाही. कोल्हापूरचे जयपूर करण्याच्या नादात आयुक्त विसरून गेले का? अशी विचारणा आता होऊ लागली आहे.
कोल्हापूर शहरात रस्त्यांची झालेली दैना, पाणीपुरवठा, आगामी मनपा निवडणूक आणि त्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी, तसेच शहरातील नागरी समस्या अशा एक नव्हे गंभीर समस्यांचा डोंगर असतानाच कोल्हापूर मनपाला गेल्या आयुक्तच नाही, अशी भीषण स्थिती आहे. प्रशासक असतानाही मनमानी करणारा कर्मचारी वर्ग वालीच कोणी नसताना किती तत्परतेने काम करत असेल हा संशोधनाचा विषय आहे. मनपामध्ये आयुक्त पद रिक्त असतानाच उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आरोग्याधिकारी, नगररचना विभाग सहाय्यक संचालक पदेही रिक्त आहेत.
थेट पाईपलाईन टप्प्यात असताना आयुक्तच नाहीत
कोल्हापूर शहरासाठी असलेली थेट पाईपलाईन योजना पूर्णत्वास जात असतानाच कोल्हापूर मनपाकडून कामाचा पाठपुरावा आणि पाहणी करण्यासाठी आयुक्तच नाहीत? अशी स्थिती आहे. कोल्हापूर शहरासाठी काळम्मवाडी धरणातून पाणी देण्यासाठी 53 किमी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
कोल्हापूर मनपाची निवडणूक तोंडावर
कोल्हापूर मनपाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. तेव्हापासून कोल्हापूरवर प्रशासकराज सुरु आहे. या कालावधीत तीनदा मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण, मतदार याद्यांचे पाणी फेरले. मात्र, राज्यातील सत्तांतर, ओबीसी आरक्षण आदी मुद्यांमुळे त्या तयारीवर पाणी फेरले आहे. आता पुन्हा नव्याने प्रक्रिया करूनच पावसाळ्यानंतर मनपा निवडणूक होईल, अशी चिन्हे असतानाच तयारीसाठी आयुक्त नाहीत, अशी स्थिती आहे.