कोल्हापूर : ज्यांच्या विरोधात आजपर्यंत लढलो त्यांनाच आता सोबत घेत मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली आहे अशी स्थिती इचलकरंजीमधील भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर गटाची झाली आहे. एक महिन्यांपूर्वी कोल्हापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी सुरेश हाळवणकर सुद्धा उपस्थित होते. या दोन्ही पिता पुत्रांना सुरेश हाळवणकर यांनीच व्यासपीठावर नेले होते. त्यामुळे इचलकरंजीमध्ये हाळवणकर गटांमध्ये आणि प्रकाश आवाडे गटामध्ये ममोमिलन झालं असल्याची चर्चा रंगली. 


कार्यकर्त्यांची खदखद समोर


मात्र गेल्या महिन्याभरापासून प्रकाश आवाडे यांचे साधं स्वागत सुद्धा इचलकरंजी भाजप कार्यालयात करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आवाडे हे उमेदवारीचा शब्द घेऊन भाजपमध्ये आले असले तरी या दोन्ही गटांमधील अस्वस्थता कायम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची खदखद समोर येऊ लागली आहे. आज सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात दिसून आली. कार्यकर्त्यांनी थेट भाजपचे पितामह माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कार्यकर्त्यांवर असलेल्या एका वक्तव्याचा दाखला दिला. त्यांंचे वक्तव्य सादर करताना कशा पद्धतीने डावललं जात आहे याचाच पाढा वाचण्याचा प्रयत्न केला. एका कार्यकर्त्याने निष्ठेला हाच का न्याय? अशी विचारणा पोस्टरच्या माध्यमातून केली. यावर ती सुरेश हाळवणकर यांची प्रतिमा होती. त्यामुळे सुरेश हाळवणकर आणि आवाडे गटामध्ये खदखद असल्याचे स्पष्ट आहे.


सुरेश हाळवणकर गटाकडून कोणती भूमिका घेतली जाणार?


आवाडे यांनी वरिष्ठ पातळीवरून हालचाली करत भाजप पक्षप्रवेश घडवून आणला असला, तरी स्थानिक पातळीवर स्थिती मात्र बदललेली नाही. त्यामुळे आवाडे गटाला उमेदवारी देण्यात आली तर सुरेश हाळवणकर गटाकडून कोणती भूमिका घेतली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे दोन सहयोगी आमदार आहेत. यामध्ये प्रकाश आवाडे यांचाही समावेश होता. 2019 मध्ये राज्यांमध्ये राजकीय नाट्य घडल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी सुद्धा भाजपाला पाठिंबा दिला होता. या दोन्ही नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही जागांवर दावाही केला आहे. त्यामुळे दोन नेत्यांची महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र प्रकाश आवाडे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत विधानसभेचा शब्द घेतल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा प्रकाश आवाडे यांनी पण धैर्यशील माने यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वी मध्यस्थी करत त्यांची नाराजी दूर केली होती व थेट त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घेऊन आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या