विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांवरही मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. “विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही,” असे ते म्हणाले.

Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चांपासून ते अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांपर्यंत विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले असताना आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी “रोहित पवारांनी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये कृपया भाग घेऊ नये,” असं म्हटलं आहे. अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले की, “लोकांच्या मनातील शंका दूर झाल्या पाहिजेत,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे. राज्य सरकार या सर्व आक्षेपांची सखोल चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यापेक्षा अधिक दुःख आम्हाला झालं आहे
“अजितदादांच्या अपघातामुळे जसं रोहित पवारांना दुःख झालं, त्यापेक्षा अधिक दुःख आम्हाला झालं आहे. आमच्याही मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत,” असे सांगत मुश्रीफ यांनी भूमिका मांडली. मात्र, रोहित पवारांना पक्षांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे बजावले. “पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो,” असेही ते म्हणाले.
त्या चर्चांमध्ये अजितदादा एकटेच सहभागी होते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांवरही मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. “विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही,” असे ते म्हणाले. मात्र, त्या चर्चांमध्ये अजितदादा एकटेच सहभागी होते, आमच्यापैकी कोणीही त्याठिकाणी नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती बदलल्याचे नमूद करत मुश्रीफ म्हणाले की, “आता आम्हाला भारतीय जनता पक्षाला विश्वासात घ्यावे लागेल. त्यांचे मत काय आहे ते पाहावे लागेल. शिवाय सुनेत्रा वहिनी आणि कुटुंबाला काय वाटते, यावरही पक्षात चर्चा होईल.”
विलीनीकरणाच्या चर्चेत आपण स्वतः सहभागी नव्हतो, हेही त्यांनी मान्य केले. “काही जण सांगतात की पवार साहेबांनी थांबवायचं आणि अजितदादांनी नेतृत्व करायचं अशी चर्चा होती. पण अजितदादांनी आम्हाला याबाबत काहीही सांगितले नव्हते, हे खरं आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांना व्हीलन का केले जाते?
प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते आणि आजही आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरही पटेल कार्याध्यक्ष राहतील, असे त्यांनी सांगितले. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असल्याने आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार त्यांना आहे. “या दोघांना विनाकारण टार्गेट का केले जाते? त्यांना व्हीलन का केले जाते? आमच्या पक्षामध्ये कोणीही लुडबुड करू नये,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान
दरम्यान, कोल्हापूरच्या विकास वाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्याचा निर्णय झाल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली. या मैदानाचा प्रस्ताव संभाजीराजे छत्रपती यांनी अजितदादांकडे दिला होता. एमआयडीसीची जमीन देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादांनी मांडलेल्या चार ते पाच महत्त्वाच्या प्रस्तावांवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय घेत आदरांजली वाहिल्याचे त्यांनी नमूद केले. कोल्हापूरच्या या मैदानाला स्वर्गीय अजितदादा यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आल्याबद्दल त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे आभार मानले आणि “आता या नावामध्ये कोणताही बदल होणार नाही,” असे ठामपणे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या























