Harshal Surve: अखेर हर्षल सुर्वेंचा शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र; राजीनाम्यानंतर काही तासातच शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Harshal Surve: हर्षल सुर्वे यांच्यासह उपशहर प्रमुख अर्जुन संकपाळ, अर्जुन संकपाळ, इंद्रनील पाटील, प्रदीप हांडे, जयाजी घोरपडे, संकेत खोत, देवेंद्र सावंत यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला.

Harshal Surve: शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले यांची निवड करण्यात आल्यानंतर कोल्हापूर शिवसेनेमध्ये मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. पहिल्यांदा शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केला. त्यांनी आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. हर्षल सुर्वे यांच्यासह उपशहर प्रमुख अर्जुन संकपाळ, अर्जुन संकपाळ, इंद्रनील पाटील, प्रदीप हांडे, जयाजी घोरपडे, संकेत खोत, देवेंद्र सावंत यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी निवडीवरून ठाकरे गटामध्ये वाद सुरू आहे.
संजय पवार यांची शिवसेना उपनेते पदी निवड करण्यात आल्यानंतर जिल्हाप्रमुख आणि उपनेतेपद अशी दोन्ही पदे त्यांच्याकडेच होती. त्यामुळे या पदासाठी शोध मोहीम सुरू होती. या पदासाठी हर्षल सुर्वे यांच्यासह अवधूत साळोखे, रवीकिरण इंगवले यांची नावे चर्चेत होती. मात्र रविकिरण इंगवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या हर्षल सुर्वे यांनी रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वात काम करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी निर्णय मान्य नसल्यास ज्याला सोडून जायचं आहे त्यांनी जावं, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ही प्रतिक्रिया जिव्हारी लागल्याचे सांगत सुर्वे यांनी आपल्या पद आणि पक्ष सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
कोण आहेत हर्षल सुर्वे?
हर्षल सुर्वे हे गेले वीस वर्ष शिवसेनेत कार्यरत आहेत. युवा सेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर त्यानंतर रायगड जिल्हा विस्तारक कोल्हापूर जिल्हा विस्तारक या पदावर काम केले आहे. यासह शहर समन्वयक या पदावर काम करत होते. त्यांना शहरप्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती. पण, जिल्हाप्रमुख पदावर नाव निश्चित असताना ऐनवेळी तिथे दुसरी वर्णी लावून जे पद मागितलं नाही त्या पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. ज्या व्यक्तीला ही जबाबदारी दिली त्याच्यासोबत काम करणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
दुसरीकडे, शिवसेना उपनेते संजय पवार यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देत इंगवले यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. उपनेतेपद असतानाही जिल्हाप्रमुख निवडताना विचारात घेतले नसल्याचे संजय पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, आपण कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नसून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचे संजय पवार यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये पदाधिकारी सुद्धा पक्षाची साथ सोडून जात असल्याने कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाची अवस्था बिकट झाली आहे.

























