Gokul Chairman Election : आमदारकी नको, पण गोकुळचे (Gokul Chairman Election) संचालक करा अशी एक म्हण कोल्हापूरच्या (Kolhapur Politics) राजकारणामध्ये चांगलीच प्रचलित आहे. यावरून गोकुळमधील संचालकपद आणि गोकुळचे अध्यक्षपद किती ताकदीचे आणि महत्त्वपूर्ण आहे याचा अंदाज घेण्यासाठी पुरेसं आहे. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्ष निवडीमुळे गोकुळचे राजकारण ढवळून निघालं. पहिल्या दोन वर्षात विश्वास पाटील यांना संधी दिल्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाचा कारभार पाहिला. मात्र, त्यांनी जेव्हा त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आणि स्वत:हून राजीनामा देण्याची वेळ आली तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी दगाबाजी करत राजीनामा देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे, असे म्हणत गोकुळच्या स्थानिक पातळीवरील राजकारणाला राज्यपातळीवर नेण्याचा प्रयत्न केला आणि यामध्येच राजकीय संघर्ष सुरू झाला. मात्र, गोकुळच्या संचालकांनी निर्धार करत अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यामुळे अरुण डोंगळे यांचा बंडाचा परिणाम झाला नाही. मात्र, अध्यक्ष कोण होणार? यावर सस्पेन्स कायम होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट हस्तक्षेप

अध्यक्षपदासाठी राजश्री शाहू शेतकरी आघाडीकडून सर्वसामान्य चेहरा देण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि यामधूनच गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील, किसन चौगुले, अजित नरके यांच्या नावाची चर्चा रंगली होती. त्यामध्येही शशिकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Gokul) यांनी गोकुळच्या राजकारणामध्ये थेट हस्तक्षेप करत कोणत्याही स्थितीत गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे, असा शब्द देत नेत्यांना पेचात टाकले. हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर व विनय कोरे यांच्यावर अध्यक्षपदाचा उमेदवार बदलासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दबाव आणल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष दालनामध्ये बैठक पार पडली. तब्बल अडीच तासांच्या चर्चेनंतर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे बंद लिफाफ्यात अध्यक्षांचे नाव देण्यात आलं. एकंदरीत तयारी पाहता आणि नविद मुश्रीफ तातडीने परदेशातून आल्याचे पाहता त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित होते. त्याची औपचारिकता आज पार पाडण्यात आली. 

मुश्रीफांची जिल्ह्याच्या अर्थकारणावर पकड 

जिल्हा बँक आणि गोकुळच्या अध्यक्षपदामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरात दोन्ही महत्त्वाची जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे गेली आहेत. या दोन्ही केंद्रांवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा थेट संदर्भ आहे. चुलीपर्यंतच्या राजकारणाशी सुद्धा थेट संबंध आहे, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वत:कडे असल्याने नविद यांच्या नावाला विरोध केला, अशीही माहिती समोर आली, पण सन्मानाने त्यांनी दुसऱ्या चेहऱ्याला संधी दिली असती, तर कदाचित त्या विरोधाला अधिक समर्पक भावना दिसून आली असती. तथापि, त्यांनी आपल्याच मुलाला संधी दिली. त्यामुळे याचसाठी केला होता अट्टाहास असं तर नाही ना? अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आणखी बळ मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच केपी पाटील यांची घरवापसी झाली आहे. कागलमध्ये त्यांच्या आमदारकीच्या विजयाचे नेहमीच शिल्पकार राहिलेले माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनीही भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे कागलमध्ये समरजित घाटगे यांची कोंडी केली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी कागल मतदारसंघापासून ते जिल्ह्याच्या अर्थकारणापर्यंत पकड अधिक मजबूत केली आहे.  

गोकुळ निवडणूक वर्षभरावर, समझोता एक्स्प्रेस कुठवर जाणार?

गोकुळची पंचवार्षिक निवडणूक सुद्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ आणि जिल्हा काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांचा दोस्ताना कायम राहणार की महायुती म्हणून निवडणूक लढवावी लागणार? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोकुळमधील सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमधील सर्वच नेते सध्या महायुतीमध्ये आहेत. अपवाद फक्त सतेज पाटील यांचा आहे. त्यामुळे या सर्व राजकारणामध्ये ते एकाकी पडल्याचे चित्र आहे. शेवटच्या एक वर्षाच्या अध्यक्ष निवडीमध्ये त्यांना तगडा झटका बसला आहे. ज्या पद्धतीने अध्यक्ष निवडीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप केला ते पाहता आगामी पंचवार्षिक निवडणूक मुश्रीफांना महायुती म्हणून लढवावी लागेल, असेच चित्र दिसत आहे. अर्थात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जर स्थानिक पातळीवर आघाडीचे सर्वाधिकार स्थानिक नेत्यांना दिल्यास चित्र बदलू सुद्धा शकते. मात्र, विरोधात फार संधी नसतानाही गोकुळमधील विरोधी गट असलेल्या महाडिकांकडून कोल्हापूर-मुंबई वारी सुरु होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुश्रीफ यांना समझोता राजकारणाची अडचण होऊ शकते. कोणत्याही स्थितीत गोकुळची सत्ता खेचण्यासाठी महाडिक नव्याने प्रयत्न करतील यात शंका नाही. 

विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांना धक्का

लोकसभा निवडणुकीत नव्हे, तर विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार विनय कोरे, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची भूमिका एकमेकांना पडद्यामागून मदत करणारीच होती. या सर्व खेळात सर्वाधिक फटका सतेज पाटील यांनाच बसला. ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणमधून पराभूत झाले हा त्यांच्या जिव्हारी लागणारा घाव होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही नेत्यांची भूमिका कोणती असेल हे औत्सुक्याचे असेल. जिल्ह्यात सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुद्धा येऊ घातल्या आहेत. पावसाळ्यानंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हसन मुश्रीफ आणि पाटील यांचा दोस्ताना असाच राहणार की आता त्यांना पक्षीय पातळीवर एकमेकांविरोधात भूमिका घ्यावी लागणार? हे सुद्धा पहावं लागणार आहे. 

गोकुळच्या राजकारणात घराणेशाहीचा खुट्टा आणखी घट्ट 

नविद मुश्रीफ मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत. चेतन नरके जेष्ठ संचालक आणि गोकुळची सत्ता अनेक वर्ष भोगणारे अरुण नरके यांचे चिरंजीव आहेत. अजित नरके आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू आहेत. रणजितसिंह पाटील माजी आमदार के . पी . पाटील यांचे चिरंजीव आहेत. कर्णसिंह गायकवाड माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे चिरंजीव आहेत. अमरसिंह पाटील माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे चिरंजीव आहेत. शौमिका महाडिक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या