कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) कार्यकारी संचालकांना झालेल्या बेदम मारहाणीनंतर कोल्हापुरात पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध महाडिक कुटुंबीयांच्या वादात ठिणगी पडली आहे. कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मारहाण करण्यात आली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या मारहाणीच्या प्रकरणानंतर सतेज पाटील गटाच्या 23 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संदीप नेजदार यांनी सहकाऱ्यांसमवेत केलेल्या मारहणीत सोन्याच्या चेनसह लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. प्रकाश चिटणीस यांच्यावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. राजाराम कारखान्याबाबत घडलं म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी कोणताही असा प्रकार करायचा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 


संदीप नेजदारसह 8 संशयित पोलिसांच्या ताब्यात


दरम्यान, राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील गट पराभूत होण्यास कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस जबाबदार असल्याच्या कारणातूनच मारहाण करण्यात आली. या प्रकरणात संदीप नेजदारसह 8 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. एमडी प्रकाश चिटणीस यांच्यावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर माजी आमदार अमल महाडिक यांचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले आहेत. शाहूपुरी पोलिसांनी संदीप नेजदार यांच्यासह मारहाण करणाऱ्या साथीदारांवर भा द वि सं कलम 307, 120 ब, 327, 341, 143, 147, 427,149 अन्वये केले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


एमडींना मारहाण करणारे सतेज पाटलांचे गुंड 


धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, कारखान्याच्या अधिकाऱ्यांना मारहाण ही सहकारातील काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या सहकाराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीही घडलेलं नाही. कारखान्याच्या एमडींना मारहाण करणारे सतेज पाटलांचे गुंड आहेत. सतेज पाटील यांनी आपल्या गुंड प्रवृत्तीचे दर्शन काल दाखवून दिले. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव केला. ते मनोरुग्न आहेत, पराभव पचवू शकत नाहीत. 


सतेज पाटील यांची लिंक लागली तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे 


महाडिक यांनी सांगितले की, गुंड संदीप नेजदार यांचा सगळा ऊस कारखान्याने नेला आहे. कारखाना बदनाम करायचा म्हणून कट रचून हल्ला केला. हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर कडक कारवाई केली पाहिजे. या सगळ्यांमध्ये सतेज पाटील यांची लिंक लागली तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. सतेज पाटील यांच्याकडे काही बंगालची माणस आहेत जे जादूटोणा किंवा भविष्य बघत असतात, असा टोला त्यांनी महायुतीवरून केलेल्या वक्तव्यावरून लगावला. आमचा महायुतीतील अंतर्गत विषय आहे आम्ही बघून घेऊ. काँग्रेसच्या नेत्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे गरजेचं नाही. सतेज पाटील पालकमंत्री असताना आम्हाला दहा टक्के नाही तर दहा रुपये देखील दिले नाहीत, त्यामुळे आता ते कोणत्या तोंडाने निधी मागत आहेत? असा सवाल त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या