Rajesh Kshirsagar on Raju Shetti: काही चांगल होत असेल तर त्यात खोड घालायची प्रवृत्ती काही लोकांची आहे. त्यामुळे दुधात पडलेला मिठाचा खडा शेतकरी बांधवांनीच बाजूला करून राजू शेट्टी यांना सलग दुसऱ्यांदा घरी बसविले. दातृत्व काय असते हे मला राजू शेट्टी यांच्यासारख्या दलबदलू व्यक्तीकडून शिकण्याची गरज नाही. आई अंबाबाई चरणी मी माझे जीवन दान करेन.पण, निव्वळ स्टंटबाजीसाठी दातृत्वाची भाषा करणारे राजू शेट्टी कोरोना आणि महापूर काळात कोणत्या बिळात लपले होते, हे जनतेने पाहिले आहे. त्याचमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. याचे आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
राजेश क्षीरसागर बिंदू चौकात फिरकलेच नाहीत
राजू शेट्टी यांच्यावर पाचशे कोटींचा आरोप केल्यानंतर राजेश क्षीरसागर यांना ती सिद्ध करून दाखवा आणि नावावर करून देतो असे आव्हान दिले होते. तसेच बिंदू चौकात येण्यास सांगतिले होते. राजू शेट्टी यांनी काल (26 जुलै) बारा वाजताच बिंदू चौकात येत दोन तास ठिय्या मांडला, पण क्षीरसागर फिरकलेच नाहीत. तरीही शेट्टी यांनी बक्षीसपत्र वाचून दाखवत कधीही रात्री अपरात्री येऊन घेऊन जाण्यास सांगितलं होतं. यानंतर आता राजेश क्षीरसागरांनी प्रसिद्धीपत्रकातून शेट्टी यांच्यावर टीका केली आहे.
राजकारणाला आणि आंदोलनाला काही मर्यादा
क्षीरसागर यांनी म्हटलं आहे की, राजकारणाला आणि आंदोलनाला काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा आम्हाला शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकविल्या आहेत. त्यामुळे आजही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सुत्रानेच काम करत आहे. त्याचे फळही जनतेने या निवडणुकीत दाखवून दिले. महाभयंकर कोरोना आणि दोन्ही महापुराच्या गंभीर परिस्थितीवेळी रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली आहे. कोल्हापुरातील जनता हेच माझ कुटुंब समजून भाजी-पाला, धान्य अशा जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. पूरस्थितीत स्वत: पाण्यात उतरून बचाव कार्यात सहभागी झालो. देव धर्मासाठी, जनतेसाठी मी काय दान केले आहे, हे वेळोवेळी प्रसिद्धीमाध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. या कामाचे मोल समजण्याएवढी राजू शेट्टी यांची बुद्धिमत्ता नाही. कारण, त्यांच्यासारख्या दलबदलू व्यक्तीने ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर सत्ता भोगली त्यांनाच बाजूला करत सद्या कारखानदारांशी युती केली आहे.
वास्तविक पाहता शेतकरी बांधव कर्जबाजारी होत असताना उसाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतकरी बांधवांनी केलेल्या आंदोलनात राजू शेट्टी उदयाला आले. ऊसाला मिळालेला ६०० रुपयांचा दर ३००० रुपये झाला हा शेतकरी बांधवांची एकजूटीचा विजय होता मात्र श्रेय राजू शेट्टी यांनी घेतले. त्यातूनच लॉटरी लागून ते खासदार झाले. पण, आता शेतकरी बांधवांना बाजूला करून राजू शेट्टी ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्यांची सावलीही राजू शेट्टी यांच्यावर पडल्याने "खोट बोल पण रेटून बोल" अशी त्यांची वृत्ती बनली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या