Jayant Patil : विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या संतापात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना (Maharashtra Assembly Winter Session) असंसदीय शब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जयंत पाटील यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद आज राज्यभरात उमटले आहेत. काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली, तर काही ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूरमध्ये कागलमध्ये राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. सांगली आणि मिरजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. 


कागलमध्ये जोरदार निदर्शने


आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. कागलच्या गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, प्रदेश सरचिटणीस नवीद मुश्रीफ, दलितमित्र बळवंतराव माने, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष संजय चितारी, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते आदी प्रमुख उपस्थित होते. 


सरकार गैरव्यवहार आणि काळी कृत्ये झाकण्यासाठीच प्रचंड दडपशाही करीत असल्याचा प्रताप उर्फ भैया माने यांनी केला. दडपशाही करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा धिक्कार असो, शिंदे- फडणवीस सरकारच करायचं काय?खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या. 


इस्लामपुरात आंदोलन 


इस्लामपूरमधील कचेरी चौकात तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, निषेध मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाल्याने इस्लामपूर पोलीसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी यांनी बंदी आदेश लागू केला आहे. या आवाहनास प्रतिसाद देवून आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही, अशी हमी दिल्याने त्यांना समज देवून सोडण्यात आले. जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक निलंबित करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.


सांगली- मिरजेत शिंदे- फडणवीस सरकार विरोधात आंदोलन


जयंत पाटील यांना विधानसभेमधून निलंबित करण्यात आल्याचे संतप्त पडसाद सांगलीच्या मिरजेमध्येही उमटले. सांगली आणि मिरजमध्ये राष्ट्रवादीकडून शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जयंत पाटील यांच्यावर केलेल्या निलंबन कारवाईचा निषेध नोंदवला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेला कारभार राष्ट्रवादी सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


आटपाडीत शिंदे - फडणवीस सरकारविरोधी जोरदार आंदोलन


जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या, अशी जोरदार मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आटपाडीत शिंदे-फडणवीस सरकारविरोधी जोरदार आंदोलन करण्यात आले. आटपाडीच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. मागे मागे घ्या, जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या, शिंदे फडणवीस सरकारचा धिक्कार असो निषेध असो, विरोधकांची मुस्कटदाबी करणाऱ्या हुकुमशहा सरकारचा धिक्कार असो, जयंत पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या