Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेसाठी नाईट रूटची निश्चिती तातडीने करावी, कार्गो सुविधा सुरू करावी, वाहतुकीची नवी क्षेत्र निश्चित करावी अशा विविध मागण्याचे विवेदन काँग्रेस आमदारांकडून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना देण्यात आले.


ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते कोल्हापूर विमानतळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा घेणार आहेत. शिंदे यांची कोल्हापूरमधील काँग्रेस आमदार ऋतुराज  पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगावकर यांनी भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान, कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग आणि सर्व हवामान ऑपरेशन्सला मान्यता दिल्याबद्दल कोल्हापूरवासियातर्फे शिंदे यांचे आभार मानण्यात आले. 



लवकरात लवकर कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय घेण्याचे आश्वासन ज्योतिरादित्य शिंदे त्यांनी दिल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. 


ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतले जोतिबा, अंबाबाईचे दर्शन



कोल्हापूर दौऱ्यावर असलेले केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोतिबा डोंगरावर जोतिबा दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेतले. या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मिळणे हे आपल्यासाठी सौभाग्याचे असल्याचे यावेळी ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. ही माझ्या अस्तित्वाची माती असून माझे कौटुंबिक संबध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिंदे महाराज यांची विचारधारा या मातीत येऊन पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आज केल्याचे त्यांनी नमूद केले. 


राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राचे अनावरण


दरम्यान, राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये बसवण्यात आलेल्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. राजमातांचे समर्पण विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल, अशी आशा असल्याचे ते यावेळी म्हणाले.