कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur News) सर्वत्र कचरा तुंबत असतानाच आता कचऱ्यावरून अलीकडे ग्रामीण आणि शहरी वाद होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उपनगरातील कचऱ्यांबाबत ठाम भूमिका घेत कचरा उचलणे बंद केले आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. महानगरपालिकेने 3-4 वेळा पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषदेकडून दाद देत नसल्याचे चित्र आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी मात्र ग्रामीण भागातील रहिवाशांना पकडून थेट दम दिला आहे. तर वैतागलेल्या रहिवाशांनी रस्त्यावर कचरा फेकण्यास सुरुवात केली आहे.


शहराच्या प्रवेशद्वारालाच कचऱ्याचे ढीग 


कोल्हापूर शहराची व्याप्ती वाढत आहे. शहरातील उपनगरांच्या बाजूला ग्रामीण भागाला सुरुवात होते. त्या ठिकाणीही वस्ती वाढत आहे. शहराशेजारी असलेल्या पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, बालिंगे, नागदेवाडी, पाडळी, शिंगणापूरसह अन्य गावात रहिवाशी क्षेत्र सुरू झालं आहे. अशा परिस्थितीत तयार झालेला कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. घरफाळा घेऊनही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात या ग्रामपंचायती कमी पडत आहेत. 


शहराच्या प्रवेशद्वारालाच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्यामुळे कोल्हापूर शहर आणि ग्रामीण हा वाद टोकाला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील रहिवासी शहराच्या हद्दीत कचरा आणून टाकतात. कोल्हापूर महानगरपालिकेची गाडी घरोघरी फिरत असल्याने हा कचरा उचलणार कोण? असा सवाल कर्मचारी करत तो उचलत नाहीत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत चालली आहे. त्याबाबतच्या तक्रारी महानगरपालिकेकडे देखील करण्यात आली.


शहरी आणि गामीण रहिवाशांमध्ये वाद सुरू


गेल्या चार महिन्यात महानगरपालिकेने जिल्हा परिषदेला चार पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, या पत्रांची दखल जिल्हा परिषद घेत नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यकडे संपर्क साधला असता होऊ शकला नाही. जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे आता शहरी आणि गामीण रहिवाशांमध्ये वाद सुरू झाले आहेत. संतप्त नागरिक आता रस्त्यावरच कचरा टाकून महापालिकेबाबत रोष व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायती घरफाळा घेत असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची हमी घेत नाही. जिल्हा परिषदेकडूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही कचरा कुठे टाकणार? असा सवाल रहिवाशी करतात. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतील कमी संवादामुळे ग्रामीण आणि शहरी वादाने डोकं वर काढलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या