Raju Shetti : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ तसेच नीट (NEET) परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरात सर्वपक्षीय कॅन्डल मार्च उत्स्फूर्तपणे काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मार्चमध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी मतांचा आदर केला पाहिजे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे असी टीका शेट्टींनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झालेल्या या कॅन्डल मार्चने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशा मागण्यांसह शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी मतांचा आदर केला पाहिजे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. सोनम वांगचुक यांच्यासारख्या देशहितासाठी आवाज उठविणाऱ्या व्यक्तींना दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे," असे ते म्हणाले.
लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षेला सामोरे जातात
नीट परीक्षा प्रकरणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षेला सामोरे जातात. मात्र, परीक्षा प्रक्रियेत घोटाळे आणि अनियमितता होत असतील तर विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरते. देशातील विद्यार्थ्यांचा परीक्षांवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी नीट घोटाळ्याची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अन्यायाच्या प्रत्येक घटनेविरोधात समाजाने एकजुटीने उभे राहिले पाहिजे
दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनीही यावेळी नागरिकांना संबोधित करताना अन्यायाविरोधात समाजाने एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. "सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई असो किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित नीट घोटाळा असो, अन्यायाच्या प्रत्येक घटनेविरोधात समाजाने एकजुटीने उभे राहिले पाहिजे. हा कॅन्डल मार्च कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून लोकशाही, न्याय आणि देशाच्या भवितव्यासाठी आहे," असे त्यांनी सांगितले.
मार्चदरम्यान नागरिकांनी शांततेत मेणबत्त्या प्रज्वलित करून लोकशाही मूल्यांचे रक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. अशा घोषणा दिल्या. केंद्र सरकारने जनभावनांचा आदर करून सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी तसेच नीट परीक्षा घोटाळ्यातील दोषींना कठोर शिक्षा करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI