Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar on Cabinet Expansion) यांनी विधानसभेत आज विदर्भातील विकासाच्या मुद्यावरून, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कानउघडणी केली. यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांना चांगलेच शालजोडे लगावले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकदाच काय तो दिल्लीला फोन करा आणि तुम्हाला कोणाला घ्यायचं आहे त्याला घ्या आणि मंत्रिमंडळ विस्तार करा, असा टोला त्यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि स्वत:कडे सर्वाधिक खाती ठेवण्यावरून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शालजोडे लगावले. यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकला. अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना बाजूला करण्यावरूनही फडणवीसांना चिमटे काढले.
अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून बोलताना अनेक शालजोडे लगावले. तसेच मंत्रिमंडळात महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने त्यांनी तोफ डागली. अजित पवार म्हणाले की, सहकार मंत्र्यांकडे काम आणल्यास देवेंद्रजींना विचारतो म्हणतात, पण त्यांच्याकडे सहा खात्यांचा कारभार आहे आणि भार कशासाठी टाकता? त्यांच्याकडे सहा पालकमंत्रीपद आहेत. ते कतृत्ववान आहेत, पण सहा पालकमंत्री नेमल्यास जास्त काम होणार नाही का? आपण महिलांबाबत बोलत असता, पण सहा महिन्यात एक महिला मंत्री करण्यासाठी सापडली नाही का? मी आता वहिंनींना (अमृता फडणवीस) जरा बघा यांच्याकडे म्हणून. त्यांनी सांगितल्यास लगेच होऊन जाईल.
अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला!
अजित पवार म्हणाले, भाजपमधील अनेक मंत्री देवेंद्रजींना विचारलं पाहिजे म्हणतात, शिंदे गटातील मंत्र्यांचा सवतासुभा असतो, त्यांना काही अडचण नाही, पण हे सगळ करत असताना आपल्या राज्यात ही पद्धत नव्हती. प्रत्येक कामासाठी आपल्याकडे जायला लागणं हे बरोबर नाही. आपल्या दोघांचे, तर चांगलं चाललं आहे. देवेंद्रजींना विचारलं की, मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि त्यांना विचारलं की ते म्हणतात देवेंद्रजींनी म्हटल्यास मी केलं. ही टोलवाटोलवी सुरु आहे. दादा तुमची मला इतकी कधी कधी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती, तर अशी टोलवाटोलवी केली नसती. कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला केवळ एक दोन साधी विभाग देऊन बाजूला ठेवलं आहेय आणि स्वत: महत्वाची सहा सहा विभाग घेतले आणि या पद्धतीचे राजकारण करता? बरोबर अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला.
ते पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 18 मंत्री सभागृहात आहेत, पण एकही महिला मंत्री नाही ही किती नामुष्की आहे, हा महिलांचा अपमान आहे. रात्री लावा फोन दिल्लीला आणि उद्या करा मंत्रिमंडळ विस्तार. पहिल्यांदा आपण दोघांनी चालवलं, नंतर वाढवले, पण अजून 22-23 लोक घेता येतात. ज्यांना कोणाला संधी द्यायची त्याला द्या, पण एक दोन विभाग द्या, पण विस्तार करा.
इतर महत्वाच्या बातम्या