Kini Toll Plaza : किणी टोल नाक्यावर आज मनसेकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मनसेनं आक्रमक भूमिका घेता किणी टोल नाक्यावरील वसूली बंद करण्यात यावी, अशी मागणी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मनसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना मनसेच्या राज्यभरातील आंदोलनामुळे 65 टोलनाके बंद झाल्याचे म्हटले होते. या मुद्द्याला कोणत्या राजकीय पक्षाने हात घातला नाही, मात्र मनसेनं यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले होते.
दरम्यान आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किणी टोल नाक्यावर त्याचे पडसाद उमटले. गेल्या काही दिवसांपासून हा टोल नाका चर्चेत असून मुदत संपूनही वसुली सुरू असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी याच किणी टोल नाक्यावर मनसेकडून या संदर्भात आंदोलन करण्यात आले होते. आज पुन्हा आंदोलन करण्यात आले. टोल नाक्यावरील वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मारल्यानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी काही आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून करण्यात आली. किणी टोल नाक्यावरील टोल वसूली मुदत संपली असली, तरी भूसंपादनाचा निधी वसूल झाला नसल्याचा दावा टोल नाक्यावरील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राज्यातील अनेक टोल नाक्यांवर मुदत संपूनही वसूली सुरुच असल्याने मनसेकडून सातत्याने आंदोलने करण्यात येत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या